Latur News Update : लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीकाठच्या 14 गावांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. या उपक्रमात जिल्ह्यातील हजारो लोक सहभागी झाले होते. जिल्हा प्रशासनाकडून या वृक्षलागवडीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. देखील या वृक्षलागवडीच्या उपक्रमात सहभागी झाले होते.  लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवड करणे अनिवार्य असल्याचे मत यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी व्यक्त केले.  


मांजरा नदीकाठावर दहा किलो मीटरपर्यंतच्या क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यात आली. भातखेड येथे वृक्ष लागवडीचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले.  
 
प्राथमिक शाळा कासारखेडा, चिकलठाणा, बामणी, प्रशाला भातांगळी, श्रीराम विद्यालय कासारखेडा, जय भवानी विद्यालय बामणी, मातृभूमी विद्यालय भातांगळी या शाळेतील सर्व शिक्षक भातांगळी येथे तसेच प्रा. शा. खुलगापूर, मळवटी, कासारगाव, कोळपा, हनमंतवाडी, सकपाळ नगर, भातखेडा, छत्रपती शिवाजी विद्यालय मळवटी, राजमाता सुशीला देवी विद्यालय महाराणा प्रताप नगर या शाळेतील सर्व शिक्षकांनी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सहभाग घेतला.  
 
"देशात लातूर जिल्हा कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. राज्यात लातूरमध्ये 0.6 टक्के वन क्षेत्र आहे. परंतु, वनांचं क्षेत्र सरासरी 33 टक्के इतके असणे आवश्यक आहे. लातूर जिल्हा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. जिल्हा प्रशासन, नागरिक, संस्था, ग्रामपंचायत तसेच शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने वृक्ष लागवड करण्यात येत आहे.  वृक्ष लागवड  करणे ही काळाची गरज समजून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वृक्ष लागवडीची प्रक्रिया सातत्याने अविरत आपल्याला जबाबदारी समजून सुरु ठेवावी लागणार आहे, असे मत जिल्हाधिकारी  पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी व्यक्त केले. 


लातूर तालुक्यातील भटखेडा, सोनवती, धनेगाव, शिवणी खुर्द, भातांगळी, भाडगाव, रमजानपूर, उमरगा, बोकनगाव, सलगरा ( बु. ), बिंदगीहाळ तर औसा तालुक्यातील शिवणी बु, तोंडवळी, होळी या चौदा गावांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली.
 
सेल्फी पॉईंटचे आकर्षण
आज सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी दहा किलोमीटरची मानवी साखळी करून 28 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार असा सेल्फी पॉईंट ग्रीन वृक्ष टीमने केला होता. सेल्फी पॉईंटमध्ये  जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फोटो काढला. नंतर अनेक नागरिकांनी सेल्फी पॉईंटसोबत फोटो काढले.