Soybean Farming : अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे म्हणावे त्या प्रमाणात सोयाबीन (Soybean) अजूनही बाजारात दाखल झाला नसल्याचे चित्र आहे. तर असे असताना आता सोयाबीनची लागवड पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर बाजारात भाव नाही आणि आवक ही नाही अशी अवस्था सद्या सोयाबीन पिकांची झाली आहे. 


सोयाबीनच्या भावात तेजी नसल्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने अजूनही सोयाबीन विकले नाही. मात्र,  देशात सध्या सोयाबीनच्या दरवाढीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर पाच हजाराच्या पुढे सरकत नाहीत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.


का केली नाही सोयाबीनची विक्री ?


मराठवाड्यातील प्रमुख पीक म्हणून सोयाबीनचा उल्लेख केला जातो. मागील दोन वर्षात सोयाबीनला चांगले दर मिळाले होते. याच कारणामुळे सोयाबीनचा पेरा वाढला होता. उत्तम पीक आलं की पैसाही मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र पेरणी नंतर संकटाची मालिका सुरू झाली.यात अतिवृष्टी, ऐन काढणीच्या वेळी झालेला अवकाळी पाऊस आणि सोयाबीनवर आलेला यलो मोझ्याक रोग, खोडकिडीचा वाढलेला प्रादुर्भाव तसेच गोगलगाईच्या प्रादुर्भावयामुळे उत्पन्नात मोठी घट झाली होती. यामुळे सोयाबीन सारख्या पिकावर अर्थकारण असलेला शेतकरी पार कोलमडून पडला आहे. वाढलेला उत्पादन खर्च आणि कमी उत्पादन आणि बाजारभाव अत्यल्प अशा कात्रीत शेतकरी सापडला होता. ज्या शेतकऱ्यांची होल्डिंग कॅपॅसिटी आहे अशा शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात आणलेच नाही. तर भाव वाढेल या एका आशेवर सोयाबीन अद्यापही साठवणूक करून ठेवलेलेच आहे.


खरिपाचा नवीन हंगामात पुन्हा सोयाबीन


गतवर्षीचा सोयाबीन अद्याप बाजारात आलेला नसतानाच खरिपातील सोयाबीनच्या लागवडीची गडबड सुरू आहे. जागतिक बाजारपेठेचा विचार करता सोयाबीनला उठाव नाही. बाजारात सोयाबीनला पाच हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर मिळत नाही. आता तरी भाव वाढ होईल ही अपेक्षा हळूहळू धूसर होताना दिसते आहे. 


हमीभाव आहे मात्र भाव नाही


केंद्र सरकारने सोयाबीनला चार हजार तीनशे रुपयांचा हमीभाव दिला आहे. वाढलेला उत्पादन खर्च घटलेले उत्पादन आणि हमीभाव याचे प्रमाण जुळताना दिसत नाही. बाजार भाव पाच हजाराच्या पुढे सरकत नाही. शेतकऱ्यांना किमान अपेक्षा सात ते साडेसात हजार रुपयाची आहे. हा भाव मिळाला तर हातात काही पडतं अन्यथा काहीच नाही अशी शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे आवश्यकता असेल त्याच वेळेस सोयाबीन विकू या भूमिकेवर शेतकरी ठाम आहे. मात्र असे असताना तीन महिन्यापासून सातत्याने दर पडत असून, भाव वाढण्याची कोणतीही चिन्हे आता दिसत नाहीत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


बँकांनी खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, अन्यथा...; जालना जिल्हाधिकाऱ्यांचा थेट इशारा