Jalna News : जालना जिल्ह्यातील (Jalna District) राष्ट्रीयकृत, ग्रामीण, व्यापारी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत खरीप पीक कर्जाचे (Crop Loan) वाटप सुरु राहणार आहे. जून- 2023 अखेर खरीप पिक कर्ज वाटपाचे 80 ते 100 टक्के उद्दिष्ट सर्व बँकांनी विशेषत: राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँका यांनी पूर्ण साध्य करणेची दक्षता घ्यावी. अन्यथा व्यापारी बँकांना दिलेल्या विविध विभागांच्या योजना तसेच शासकीय कार्यालयांचे वेतन जमा करणेची सुविधा काढून घेणेबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, विविध बँकांचे जिल्हा समन्वयक यांची खरीप पीक कर्जवाटप आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. 


मागील वर्षात खरीप आणि आत्ताच्या रब्बी हंगामात झालेल्या अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशावेळी अनेकदा शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत अर्ज करतो. मात्र काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करतात. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना अनेक दिवस बँकेच्या खेट्या माराव्या लागतात. याच पार्श्वभूमीवर आज जालना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, विविध बँकांचे जिल्हा समन्वयक यांची खरीप पीक कर्जवाटप आढावा बैठक पार पडली. यावेळी खरीप पिक कर्ज वाटपाचे 80 ते 100 टक्के उद्दिष्ट सर्व बँकांनी साध्य करणेची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राठोड यांनी दिल्या. असे n झाल्यास व्यापारी बँकांना दिलेल्या विविध विभागांच्या योजना तसेच शासकीय कार्यालयांचे वेतन जमा करणेची सुविधा काढून घेणेबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल, असा इशारा राठोड यांनी दिला आहे. 


पीक कर्जाची नियमित मुदतीत परतफेड केल्यास फायदा...



  • पीक कर्जाची नियमित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत रुपये 3 लाखापर्यंतच्या कर्जावरील व्याजात 3 टक्के सवलत व केंद्र शासनाकडून व्याजात 3 टक्के सवलत व्याज परतावा सवलत मिळते, त्यामुळे शुन्य टक्के व्याज दराने पीक कर्ज उपलब्ध होते.

  • तसेच शासनाने पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत रुपये 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर कर्जमाफीचा लाभ दिलेला आहे.

  • तसेच कर्जाची नियमित परतफेड केल्यास सदर खाते एनपीएमध्ये न जाता खातेदाराचा सिबील रेकॉर्ड चांगले रहाते, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर जमा होणाऱ्या रकमा काढण्यावर बँकेकडुन निर्बंध लावले जात नाहीत.

  • या सर्व सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील पीक कर्जाची परतफेड नियमितपणे करणेबाबत तसेच पीक कर्जाचे नुतनीकरण विहीत मुदतीत करण्याबाबत आवश्यक त्या कागदपत्रांसह बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तसेच जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी केले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मराठवाड्यात मागील चार महिन्यात 305 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; चिंता वाढवणारी आकडेवारी