Latur News: लातूर जिल्ह्यातील कासार शिरशी येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती झाल्यानंतर जिल्ह्यातील भाजपाच्या दोन आमदारांची या विषयावरून प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काही दिवसापूर्वी अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी निलंगा येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आलं होतं. त्याला विरोध करत कासार शिरशी इथे सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला आणि रस्ता रोकोही करण्यात आला. 


लातूर जिल्ह्यातील भाजपाचे दोन आमदार, अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्या समर्थकांमध्ये अप्पर तहसील कार्यालय वरून राजकीय संघर्ष जिल्ह्यात चर्चेत आहे. औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून कासार शिरशी येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. यामुळे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या समर्थक असलेल्या गावांमधून त्या निर्णयाला प्रचंड विरोध करण्यात आला. काही दिवसांपूर्वी निलंगा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण करत या निर्णयाचा विरोध करण्यात आला होता.


त्यानंतर आज अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात कासार शिरशी येथे एक दिवसाचा बंद आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र कर्नाटक जोडणाऱ्या कासार शिरशी मार्गे रस्त्यावर आज रस्ता रोको ही करण्यात आला होता. त्यानंतर निलंगा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन ही देण्यात आलं


संभाजी पाटील निलंगेकर यांचं नाव न घेता अभिमन्यू पवार यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, या सर्व कृती मागे कोण आहेत त्यांना जाहीर आव्हान करतो की त्यांनी माझे रोज पुतळे जाळावेत.. मात्र मी सकारात्मक राजकारण करणारा व्यक्ती आहे. कासार शिरशी तालुका निर्मितीचे वचन मी जाहीरनाम्यात दिलं होतं. ती मागणी खूप जुनी आहे आणि त्यासाठी मी कार्यरत राहणार आहे.माझ्याच पक्षातील कोणी याच्यावर राजकारण करत असतील तर मला त्याची चिंता नाही. कारण माझी बांधिलकी ही लोकांची आहे आणि मी लोकांच्या प्रश्नासाठी सातत्याने रस्त्यावर उतरेन. 


लातूर जिल्ह्यात भाजपा जशी जशी मोठी होऊ लागली तसं तसं भाजपामधील गटतट एकमेकांच्या विरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार या दोन आमदारांमधील वाद मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. कधी अभिमन्यू पवार यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचा विषय असो की कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असो, हे दोन नेते कायमच एकमेकाच्या विरोधात सक्रिय असतात. औसा विधानसभा मतदारसंघाची 65 गावे ही निलंगा तालुक्यात येतात. यावर राजकारण कायमच पेटलेले असते. आताही अप्पर तहसिलच्या निर्मितीवरून हे दोन नेते एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. 


ही बातमी वाचा: