Latur News :  लातूर (Latur) जिल्ह्यातील मरसांगवीतील 160 शेतकऱ्यांची (Farmer) चारशे एकर पेक्षा जास्त जमीन खरवडून गेली आहे. अनेक डोंगराच्या कुशीत वसलेलं लातूर जिल्ह्यातील मरसांगवी हे गाव तीरू आणि जळकोट या दोन नदीच्या संगमावर आहे. या दोन्ही नद्यांना अनेक छोटे, मोठे ओढे आणि नाले येऊन मिळतात. पण याच गावातील बाजूच्या डोंगरावर सोलार प्रकल्प तयार झाला आहे.


या सोलार प्रकल्पाला सर्व बाजूंनी कंपाउंड वॉल तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे डोंगरातून वाहत येणारे पाणी या कंपाउंड वॉलमुळे अडवलं जात होतं. पण पाण्याच्या प्रवाहामुळे ही कपाऊंड वॉल तुटली आणि सर्व पाण्याचा प्रवाह अनेक ओढ्यांच्या रुपात डोंगरावरून खाली आलं. या पाण्यासोबत अनेक मोठे दगड आणि वाळू वाहत आले. याचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. जवळपास 160 शेतकऱ्यांच्या जमिनी या खरडून गेल्या आहेत. यामुळे 400 एकरपेक्षा अधिक शेतजमिनी खरवडल्या आहेत.  सुपीक असणाऱ्या शेतजमिनीमध्ये आता फक्त दगड आणि वाळू असल्याचं पाहायाला मिळत आहे. 


यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर एका मानवी चुकीमुळे हे नुकसान झालं असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर या सोलार प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच या सोलार प्रकल्पावर कारवाई करण्याची मागणी देखील शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. 


शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत 


राज्यात आधीच मान्सूनने उशीरा हजेरी लावली. त्यातच लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आस्मानी संकट देखील कोसळले आहे. त्यातच आता या मानवी संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पण यामध्ये शेतकऱ्यांचे कधीही न भरुन निघणारे नुकसान झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. 


दरम्यान या या नुकसानग्रस्त भागाची पाहणी उदगीर जळकोट मतदार संघाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी केली आहे. तसेच या भागातील नुकसानीचा आकडा हा खूप मोठा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर 'या भागातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत कशी मिळवून देता येईल याबाबत आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्या सोलार प्रकल्पामुळे हे घडलं आहे असं सांगण्यात येत आहे त्याची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Latur Rain : लातूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ! जमीन खरवडून गेल्याने बळीराजा संकटात, सलग पाचव्या दिवशीहीसूर्यदर्शन नाही