लातूर: जिल्ह्यातील भाजप आमदार अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटील निलंगेकर (Abhimanyu Pawar Vs Sambhaji Patil Nilangekar) यांच्यामधील सत्ता संघर्ष कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. अप्पर तहसील कार्यालयामुळे संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. यावेळी संघर्ष आता कार्यकर्त्याच्या पातळीवरून गावागावात उतरला आहे


लातूर जिल्ह्यात भाजपा जशी जशी मोठी होऊ लागली तसं तसं भाजपामधील गटतट एकमेकांच्या विरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार या दोन आमदारांमधील वाद मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. कधी अभिमन्यू पवार यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचा विषय असो की कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असो, हे दोन नेते कायमच एकमेकाच्या विरोधात सक्रिय असतात. औसा विधानसभा मतदारसंघाची 65 गावे ही निलंगा तालुक्यात येतात. यावर राजकारण कायमच पेटलेले असते.


अप्पर तहसील कार्यालय वाद पेटला...


निलंगा तालुक्याचे अप्पर तहसील कार्यालय कासारशिरसी येथे करण्यात आले आहे. या परिसरातील 68 गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. मात्र यामुळे आता या भागातील 46 गावांतील सरपंच आणि नागरिकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. हा निर्णय औसा आमदार अभिमन्यू पवार यांनीच करवून घेतला आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी त्यास विरोध केला आहे. त्यास आता पाठबळ देत आहेत निलंगा येथील आमदार संभाजी पाटील निलंगेकर


कृती समिती स्थापन....


औसा विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या निलंगा तालुक्यातील 63 महसूली गावासाठी कासारसिरसी ता. निलंगा येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत नुकताच शासन आदेश आला आहे. या अप्पर तहसील कार्यालयाशी कासार सिरसी, कासार बालकुंदा, मदनसुरी, भूतमुगळी यासह अन्य मंडळातील कांही गावे असे एकूण 63 महसुली गावांचा प्रशासकीय कारभार अपर तहसीलदार कार्यालयातून चालणार आहे. या भागातील लोकांना विधानसभा मतदारसंघ वेगळा तर तहसील कार्यालयाचे ठिकाण वेगळे म्हणून शासनाने अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचे आदेश दिले असले तरी यासाठी अनेक गावांनी कडाडून विरोध केला आहे. शिवाय आम्हाला निलंगा येथेच तहसील व अन्य कार्यालय सोईचे होणार असून निलंगा येथे पंचायत समिती, उपविभागीय कार्यालय, पोलिस अधिकारी कार्यालय, सहकार कार्यालय, भुमीअभिलेख कार्यालय, न्यायालय असे अनेक कार्यालय आहेत. त्यामुळे एका कामामध्ये विविध विभागाचे काम करता येतात शिवाय अनेक गावांना निलंगा शहर जवळ तर कासारसिरसी अंतर दूरवर होणार असल्याने बहूतांश गावातील ग्रामपंचायतीने निलंगा येथेच आमचे गाव ठेवावे या मागणीसाठीचे ठराव घेणे सुरू केले आहे. काही गावातील कार्यकर्त्यांनीह कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर तालुका एकसंघ कृती समिती स्थापन करून आज लाक्षणिक धरणे आंदोलन केले आहे.


अभिमन्यू पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून 68 गावांनी केला निषेध


तालुका तोडण्याचा काम हे अभिमन्यू पवार  करत आहेत असा आरोप करत 68 गावातील लोकांनी आज निलंगा पंचायत समितीच्या समोर एक दिवसीय उपोषण करत अभिमन्यू पवार यांच्या प्रतिकामत्क पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे.तसेच 15 ऑगस्ट पर्यंत हा निर्णय रद्द करण्यात आला नाही तर तालुक्यात मोठे आंदोलन उभा करत आमरण उपोषणाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
    
आमदार अभिमन्यू पवार हे तालुका तोडण्याचं काम करत आहेत असा संदेश देत असंतोष निर्माण करत कृती समिती आक्रमक झाली आहे. या कृती समितीला पाठबळ संभाजी पाटील निलंगेकर देत आहेत अशी जोरदार चर्चा आता रंगली आहे.