Latur News : लातूर (Latur) शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, झोपेत असलेल्या दोन मुलांच्या अंगावर हिटरचे पाणी पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. हिटरचे पाणी अंगावर पडल्याने कव्हा गावातील मजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या दोन लहान मुली गंभीर भाजल्या आहेत. याची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. या दोन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर गावकऱ्यांनी एकत्र येत या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
अधिक माहिती अशी की, लातूरच्या कव्हा येथील नामदेव शेळके यांच्या घरात हिटरचे गरम पाणी अंगावर पडल्याने 11 वर्षीय मुलगी माहेश्वरी आणि 13 वर्षीय योगेश्वरी हे जखमी झाल्या आहेत. दोघेही 50 ते 60 टक्के भाजल्या आहेत. दोन्ही चिमुकल्या मुली झोपेत असताना हिटरमधील गरम पाणी पडले. त्यामुळे दोघीही भाजल्या. त्यानंतर जखमी मुलींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर, या घटनेमुळे शेळके कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
नामदेव शेळके यांच्या दोन्ही मुलींच्या अंगावर हिटरचे पाणी पडल्याने त्या भाजल्या आहेत. मात्र, रुग्णालयात उपचारासाठी पैसे लागत असल्याने शेळके यांच्या मदतीला गावकरी धावून आले आहेत. कव्हा येथील गावकऱ्यांनी तसेच दिशा फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. कव्हा ग्रामस्थांनी पैसे जमा करुन शेळके यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, सोशल मीडियामध्येही काही जणांनी पोस्ट करुन मदतीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत काहींनी रुग्णालयात जाऊन मुलांच्या आई-वडिलांना मदतीचे आश्वासन दिले आहे. तर अनेकांनी थेट आर्थिक मदत देखील केली आहे.
औरंगाबादमध्येही अशीच घटना...
दरम्यान काही दिवसांपूर्वी अशीच घटना औरंगाबाद जिल्ह्यात समोर आली असते. शहरातील पडेगाव परिसरात ही दुर्दैवी घटना समोर आली होती. बहिणींसोबत खेळत असताना गॅसवरील गरम पाणी अंगावर पडून भाजलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला होता. 11 जुलै रोजी रात्री उपचार सुरु असताना चिमुकलीचा मृत्यू झाला. शिद्रा हारुन शेख (2 वर्षे) असे चिमुकलीचं नाव होते. मुलीचे वडील, हारुण शेख हे बाहेरुन घरी येत होते, त्यामुळे त्यांच्या आंघोळीसाठी पत्नीने पाणी गरम करुन ठेवले होते. तर हारुण यांच्या पत्नी बाथरुममध्ये होत्या. तर गॅसजवळ हारुण यांच्या तीन मुली खेळत होत्या. त्यापैकी तिसऱ्या क्रमांकाच्या मुलीच्या अंगावर खेळता खेळता गरम पाणी सांडले. दरम्यान मुलीचे ओरडण्याचा आवाज आल्याने आईने तात्काळ धाव घेतली. यात शिद्रा गंभीर भाजली होती. तिच्यावर घाटीत उपचार सुरु असताना 11 जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या: