Nandi Drinking Milk Viral Video : अलिकडे सोशल मीडियावर नंदी दूध पित असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लातूरमधील महादेव मंदिरातील नंदी दूध पित असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक ठिकाणच्या भाविकांनी प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आता याबाबत स्पष्टीकरण दिलं असून हा हा दावा सत्य असल्याचं दाखवणाऱ्याला 21 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.


मंदिरात नंदी दूध पित असल्याचा व्हिडीओ व्हायरल


महादेव मंदिरातील नंदी दूध आणि पाणी पितो, या घटनेची सत्यता पडताळण्यासाठी लोकांनी आजूबाजूच्या अनेक मंदिरात गर्दी केली होती. याबाबत सोशल मीडियात अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मूर्ती खरच दूध पीत असेल तर 21 लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे. 


चमत्कार नाही, अफवा; अंनिसकडून स्पष्टीकरण


महादेव मंदिरातील नंदी दूध आणि पाणी पितोय असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर बघता बघता मध्यरात्रीपर्यंत अनेक ठिकाणावरून तसे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. काही भाविकांनी घरात तर काही भाविकांनी मंदिरात जाऊन नंदी दूध आणि पाणी पितोय का याची खात्री केली. यात लातूर शहर लातूरमधील अनेक ग्रामीण भागातील गावा-खेड्यात तसेच घरातही मनोभावे पूजा करत नंदी महाराजांना दूध आणि पाणी पाजण्यात आलं. 


पाहा व्हिडीओ : मंदिरात नंदी दूध पीत असल्याचा दावा



अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत जनजागरण करायला सुरुवात केली आहे. अरबीसारख्या गावात जाऊन या घटनेचा प्रत्यक्ष अनुभवही त्यांनी घेतला. अशाप्रकारे कोणती मूर्ती जर दूध आणि पाणी पित असेल आणि ते कोणी सिद्ध करून दाखवलं तर, त्या व्यक्तीस 21 लाख रुपये बक्षीस देण्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.


दावा सिद्ध करणाऱ्याला अंनिसकडून 21 लाखांचं बक्षीस


नंदी दूध आणि पाणी पितोय असा भास निर्माण होत असतो, त्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. कोणतीही निर्जीव किंवा धातूची वस्तू दगड हे पाणी पित नसतात. तसं जर कोणी सिद्ध करून दाखवलं तर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याला 21 लाख रुपये बक्षीस जाहीर करत आहे, अशी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माधव बावगे यांनी दिली आहे.