Latur News: मृत्युशय्येवर असलेल्या रुग्णाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यास जीवदान देण्यासाठी प्रयत्न करणे हे आरोग्य विभागाचे कर्तव्य असते. त्यामुळे प्रत्येक रुग्णावर योग्य उपचार करणे हे आरोग्यसेवेतील कर्मचारी आपलं प्रथम कार्य असल्याचं मानतात.  मात्र, लातूरमधील (Latur) कर्करोगाने (Cancer) ग्रस्त असलेल्या रूग्णाला रूग्णालयात भरती करून घेण्यास रुग्णालयच्या प्रशासनाने नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. . संबंधित रूग्ण आणि त्याचे नातेवाईक चार दिवसांपासून दवाखान्याच्या परिसरात रस्त्यावर बसून उपचारांची प्रतीक्षा करत असल्याचं धक्कादायक चित्र लातूरमध्ये पाहायला मिळत आहे. 


नेमकं प्रकरण काय? 


राज्यात अनेक ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करून आरोग्य सेवा भक्कम करण्याबाबत राज्य सरकारमधील मंत्री भाष्य करत असतात. मात्र अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांची अशी स्थिती पाहिली तर यास ढिसाळपणा नव्हे तर अमानवीय कृत्य म्हणावे लागेल. कांबळे पिता-पुत्र मागील चार दिवसापासून लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात कर्करोगाने ग्रस्त महिलेच्या उपचाराची प्रतिक्षा करत आहेत. ही महिला या पिता-पुत्रांची पत्नी आणि आई आहे. त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीला मृत्यूच्या दारात झुंज देताना सध्या हे पिता-पुत्र पाहत आहेत.  


या  महिलेस अन्ननलिकेचा कर्करोग आहे. जेव्हा हे पिता-पुत्र या महिलेला  लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात घेऊन गेले तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी उपचार शक्य नसल्याचं सांगत छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात गेले असता तिथूनही त्यांना पुन्हा  लातूरला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.  


औषध उपचार होत नसल्यामुळे तडफडणाऱ्या आईला गावी तरी कसे घेऊन जायचे हा प्रश्न या पिता-पुत्रांना आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात बसून राहण्याचा निर्णय घेतला.  तेथील अनेक डॉक्टरांच्या गाठीभेटी हे पिता-पुत्र घेत आहेत. परंतु त्याचा शून्य उपयोग होतानाच चित्र सध्या लातूरच्या वैद्यकिय महाविद्यालय परिसरात पाहायला मिळत आहे. 


'लातूरमध्ये उपचार शक्य नाही'


विलासराव देशमुख शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ समीर जोशी यांनी म्हटलं की, लातूरमध्ये त्यांच्यावर उपचार शक्य नाहीत याची माहिती आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना दिली असून त्यांना घरी घेऊन जाण्याचा देखील सल्ला दिला आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जर आरोग्य यंत्रणेची ही स्थिती असेल तर दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती काय असेल याचा विचार सध्या करणे गरजेचे असल्याचं म्हटलं जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Latur News : लातूर-जहीराबाद महामार्गाची दूरवस्था; एकाच वर्षात महामार्गाला भेगा, अपघाताचे प्रमाण वाढले