Latur Crime News : लातूर जिल्ह्यातील (Latur District) लेंडे गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानवी हाडांचे अवशेष आणि मानवी कवटी दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली असून, माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून, चार महिन्यांपूर्वी गावातून बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा हा अवशेष असल्याचा अंदाज आहे. मात्र याची खात्री करण्यासाठी पोलिसांकडून डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच संबधित व्यक्तीची ओळख पटणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 


अधिक माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील लेंडेगावजवळील पाझर तलावात काही मुले पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्यांना मानवी हाडाचे अवशेष आणि मानवी कवटी दिसून आली. याबाबत त्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली. त्यामुळे गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, एक मानवी हाडाचे अवशेष आणि मानवी कवटी दिसून आली. त्यामुळे याची माहिती किनगाव पोलिसांना देण्यात आली.


दरम्यान, माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून, घटनास्थळी काही कपडे आणि हातातील कडे आढळून आले आहे. तर चार महिन्यापूर्वी गावातील 38 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाला होता. त्या व्यक्तीच्या कुटुबियांना बोलावून काही ओळख पटते का? यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला. कपडे आणि हातातील कडे ओळखण्यात आले आहे. मात्र डीएनए चाचणी करुनच याची खात्री करण्यात येणार आहे, अशी माहिती किनगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी भाऊसाहेब खंदारे यांनी दिली आहे.


हत्या की आत्महत्या? 


लातूर जिल्ह्यातील लेंडे गावात मानवी हाडाचे अवशेष आणि मानवी कवटी दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. तर आढळून आलेल्या हाडाचे अवशेष कोणाचे आहे, याची ओळख संबधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी पटवली आहे. पण डीएनए चाचणी करुनच याची खात्री करण्यात येणार आहे. पण असं असलं तरीही ज्या व्यक्तीचे हे हाडाचे अवशेष आहेत त्याचा मृत्यू नेमकं कसा झाला असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तर या व्यक्तीने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली याची देखील चर्चा गावात पाहायला मिळत आहे. मात्र सर्व काही चित्र पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


Latur News : सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला वीस वर्षे कारावास