Latur Rain Update : मागील पंधरा ते वीस दिवसांपासून लातूर (Latur) जिल्ह्यात पावसाने (Rain) पाठ फिरवली आहे. लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड होत असते. पावसाने उघड दिल्याने पेरणी केलेल्या कोवळी सोयाबीनची पिके माना टाकत आहेत. ही स्थिती लातूर जिल्ह्यात सर्वत्र पहावयास मिळत आहे. लातूर ग्रामीण, जळकोट, रेनापूर, अहमदपूर, उदगीर, औसा, देवणी, चाकूर, शिरूर आनंतपाळ, कासार शिरशी, आणि निलंगातील सर्व भागात पावसाने मागील पंधरा दिवसापासून ओढ दिली आहे. काही ठिकाणी शेतीला स्प्रिंकलरने पाणी देण्यात आहे. मात्र, हे प्रमाण अत्यल्प आहे. सोयाबीनचे बहुतांश क्षेत्र हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणार आहे.


सोयाबीनसाठी एकरी दहा हजाराच्या आसपास खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता पावसाने ओढ दिल्याने संकट उभा राहलंय. येत्या काही दिवसात पाऊस झाला नाही, तर सोयाबीनचे पीक हातचे निघून जाण्याची शक्यता आहे. पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीत असलेला ओलावा निघून गेला आहे. जमिनीला आता भेगा पडायला सुरुवात झाली आहे. हे चित्र पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. 


लातूर शहरापासून 90 किलोमीटर लांब असलेल्या जळकोट तालुक्यातील पाटोदा खुर्द येथील शेतकरी गुणवंत अंधोरे यांनी सोयाबीन लावलं. औषधाची फवारणी केली, खत दिलं. अंतर मशागतही केली. मात्र, पावसाने साथ दिली नसेल तर फाशी घेऊन मारण्याची वेळ आली आमच्यावर अशी व्यथा त्यांनी मांडली आहे. जळकोट तालुक्यात सर्वत्र अशीच काही परिस्थिती असून, शेतकरी हतबल झाले आहेत. 


सर्व संकट शेतकऱ्यांवरच...


आस्मानी संकट आणि त्याच प्रकारचे सुलतानी संकटही आमच्यावर आहे. गेल्या वर्षी अडीच हजार रुपयांचा पीक विमा भरला होता. मात्र, हातात रुपया परत आला नाही. यावर्षी एक रुपयाचा पीक विमा भरलाय, पण येण्याची अपेक्षाच नाही. दरवर्षी निसर्ग साथ देत नसेल आणि सरकार मदत करत नसेल तर कुणीकडे जायचं असा प्रश्न जळकोट तालुक्यातील शेतकरी विचारतोय. 


निसर्गाच्या लहरीपणावरच शेती करावी लागतेय 


लातूर पासून पन्नास किलोमीटर लांब असलेल्या निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथील शेतकऱ्यांची अवस्था जिल्ह्याभरातील शेतकऱ्यासारखीच झाली आहे. सोयाबीन पेरलं खत टाकलं औषध फवारलेत पावसाची वाट पाहिली पण पाऊस काही पडतच नाही. शेतीकडे नुकतेच वळलेले तरुण शेतकऱ्यांनाही मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणावरच शेती करावी लागत आहे. दोन वर्षात शेती करताना आलेल्या अनुभवामुळे हे तरुण शेतकरी शेती नकोय अशा मनस्थितीत आलेत. विशेष म्हणजे लातूर प्रमाणे मराठवाड्यातील अनेक भागात अशीच परिस्थिती आहे. 


संबंधित बातमी: 


Jayakwadi Water Storage Update : जायकवाडी धरणात केवळ 34 टक्के पाणीसाठा; मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट