Jayakwadi Water Storage Update : यंदा मान्सून उशिरा आला आणि त्यात जुन महिना कोरडा गेला. तर, जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला मात्र त्यामुळे फक्त पेरणी झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्याचे 15 दिवस उलटून देखील मराठवाड्यात (Marathwada) जोरदार पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी तर गेल्या 20 दिवसांत पावसाचा थेंब देखील पडला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक प्रकल्पातील पाणीसाठा (Water Storage) आता चिंता वाढवणारा ठरत आहे. तर, मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी (Jayakwadi) धरणात केवळ 34.11  टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी आजच्या दिवशी याच जायकवाडी धरणात 94.99 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.


जायकवाडी धरणाची पाणीसाठा परिस्थिती!



  • धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1507.13 फूट 

  • धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 459.373 मीटर 

  • एकूण पाणीसाठा दलघमी : 1478.589 दलघमी

  • जिवंत पाणीसाठा दलघमी : 740.483 दलघमी

  • जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 34.11 टक्के 

  • जायकवाडी धरण बाष्पीभवन : 0.586


मागील वर्षी आजच्या दिवशीचा



  • मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा दलघमी : 2062.271 दलघमी

  • मागील वर्षी आजच्या दिवशीची उपयुक्त टक्केवारी : 94.99 टक्के 

  •  जायकवाडी पाण्याची आवक क्युसेक : 00

  • 1 जून 2023 पासुन एकूण पाण्याची आवक : 237.313 दलघमी  

  • 1 जून 2023 पासुन एकूण सोडलेला विसर्ग : 1.041 दलघमी


विभागात 84 टँकर सुरु


पावसाने पाठ फिरवल्याने आणि प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने मराठवाडा विभागात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विभागात सध्या 57 गाव आणि 22 वाड्यावर 84 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात सात शासकीय आणि 77 खाजगी टँकरचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 30 गाव आणि 4 वाड्यांवर एकूण 41 टँकर सुरु आहेत. जालना जिल्ह्यात 27 गावं आणि 18 वाड्यांवर एकूण 43  टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 


दुबार पेरणीचं संकट...


नांदेड जिल्ह्यातील काही भागात सोडले तर मराठवाडा विभागात अजूनही जोरदार अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. विहिरींनी तळ गाठलं आहे. त्यात पावसाने दडी मारल्याने पिकं माना टाकत आहे. तर, पुढील काही दिवसांत जर जोरदार पाऊस न झाल्यास खरीपाची पेरणी वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आता प्रत्येकाच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


दुष्काळाचे संकट! बीड जिल्ह्यातील 143 धरणांमधील पाणीसाठा आरक्षित; केवळ 13.30 टक्केच पाणीसाठा शिल्लक