Latur Crime News : लातूर (Latur) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, रस्त्यात अडवून विद्यार्थीनीशी गैरवर्तन करण्यात आले. तसेच गैरवर्तन करतानाचा व्हिडिओ (Video) तयार करून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केल्याने विद्यार्थीनीने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या (Suicide) केली आहे. याप्रकरणी लातूरच्या चाकूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पोलिसांनी दोघांना अटक देखील केली आहे. 


अधिक माहितीनुसार, चाकूरमधील एका महाविद्यालयात 16 वर्षीय विद्यार्थीनी 11 वी मध्ये शिक्षण घेत होती. दरम्यान, एका दिवशी विद्यार्थीनी घराकडे जात असताना तिचा आरोपींनी पाठलाग केला. तसेच, तिला रस्त्यात अडवून तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले. त्या वर्तनाचा व्हिडिओ देखील तयार करण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे आरोपींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओमुळे आपली बदनामी झाल्याच्या नैराश्यातून या मुलीने विषारी द्रव्य प्राशन केले. मुलीला उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


तीन आरोपी फरार...


या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच चाकूर पोलिसांनी दोघांना अटक देखील केली आहे. तर इतर तीन फरार झाले आहेत. फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. 


लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध उघड करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार


दरम्यान बीड जिल्ह्यात देखील एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आपले प्रेमसंबंध तुझ्या नवऱ्याला सांगून तुझा संसार उद्ध्वस्त करीन, अशी धमकी देत पस्तीसवर्षीय महिलेवर सात वर्षे अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


माजलगाव तालुक्यातील महिलेच्या नात्यातील प्रमोद मुंजा पराड (रा. शिक्षक कॉलनी, मंजरथ रोड, माजलगाव) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. नंतरच्या काळात तिचा विवाह दुसऱ्याशी झाला. त्यानंतरही प्रमोदचे महिलेसोबत संबंध होते. महिलेने विरोध केल्यास 'तुझे आणि माझे प्रेमसंबंध तुझ्या नवऱ्याला व तुझ्या कुटुंबीयांना सांगेन' अशी धमकी देत प्रमोदने विवाहितेवर सात वर्षे अत्याचार केले. त्यानंतर प्रमोदने विवाहित महिलेच्या पतीला शिवीगाळ, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिली. शेवटी महिलेने पोलिसांत धाव घेतली. तर, पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी प्रमोद पराड याच्याविरोधात माजलगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


गुप्त आजाराची माहिती व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी; तरुणानं संपवलं जीवन; लातूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना