लातूर : धनगर समाजाला (Dhangar) एसटी (ST) प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी लातूर (Latur) जिल्ह्यातील आष्टा या गावातील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडलीये. जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील आष्टा या गावातील रमेश चंद्रकांत फुले या तरुणाने आज आत्महत्या केली. आज सकाळी रेल्वे खाली उडी घेत त्यांनी आयुष्य संपवलं. आरक्षणासाठी मी झटलो मात्र आरक्षण मिळालं नाही माझी मुलं सरकारच्या स्वाधीन असं चिठ्ठीत त्याने लिहून ठेवलं. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली.
सध्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा हा अग्रस्थानी आहे. आधी मराठा आरक्षण, त्यानंतर ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण या प्रवर्गातून सातत्याने आरक्षणाची मागणी जोर धरतेय. त्यातच मराठा आरक्षणासाठी काही तरुणांनी आत्महत्येचं पाऊल उचचलं. पण आता धनगर समाजातून देखील आत्महत्येचं पाऊल उचलल्याच्या घटना समोर येतायत. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी सध्या पटलावर आहे. त्यासाठी अनेक आंदोलनं देखील होतायत. याच मागणीसाठी रमेश फुले यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं.
नेमकं काय घडलं?
धनगरांना एसटी आरक्षण मिळाल्यास तरुणांना नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असं मत रमेश फुले यांचं होतं. त्यासाठी अनेकदा आंदोलन करुनही आरक्षण मिळालं नसल्यामुळे सातत्याने ते नैराश्येत असयाचे. रविवारी रात्री ते काम आहे असं सांगून घराच्या बाहेर पडले. त्या दिवशी त्यांचे वडिलही जेवायचे थांबले होते. पण त्या रात्री रमेश काही घरी आले नाहीत. सोमवारी सकाळी थेट त्यांनी आत्महत्या केल्याचा निरोपच दारात आला आणि फुले यांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. यानंतर रमेश फुले यांच्या कुटुंबाने एकच टाहो फोडला.
चिठ्ठीत रमेश यांनी काय लिहिलं
रमेश फुले यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये त्यांनी आरक्षणासाठीच्या काही मागण्या केल्या आहेत. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मी खूप झटलो, खूप काम केलंय. पण सरकारने त्यासाठी काही केलं नाही. मी आता खचलो आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझी मुलं आता सरकारच्या स्वाधीन करतोय, अशी चिठ्ठी रमेश यांनी लिहिली. या घटनेची माहिती मिळताच धनगर समाजातील अनेक लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच घटनास्थळी चाकूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी देखील हजर झाले. चाकूर पोलिसांत यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
विविध मागण्यांसाठी निवदेन
यावेळी धनगर समाजाकडून चाकूर रेल्वे स्थानकात एक निवेदन देण्यात आलंय. या निवेदनामध्ये विविध मागण्या देखील करण्यात आल्या आहेत.
- त्यांच्या कुटूंबीयांना तात्काळ 10,00,000/- दहा लाख रुपयाची आर्थिक स्वरुपाची मदत
- कुंटूंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी
- महिन्याच्या आत नोकरीत सामील करुन घेण्याचे हमीपत्र
- संबंधित कुटुंबास त्वरीत घरकूल तसेच सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा.
- सरकारने याची गंभीर दखल घेऊन धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी.