Latur Crime News : लातूर (Latur) जिल्ह्यातील उदगीर शहरातील संभाजीनगरमध्ये एका तरुणाने महिनाभरापूर्वी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात (Udgir Rural Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणात एकूण 9 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी मयताच्या गुप्त आजाराबाबत माहिती घेऊन ब्लॅकमेल (Blackmail) करून त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.  विशेष म्हणजे मयत तरुणाने त्याच्या स्वहस्ताक्षरात लिहून ठेवलेल्या दोन चिठ्ठया (Suicide Note) मिळून आल्या आहेत. विक्रम राजेंद्र बलांडे (वय 25 वर्ष, रा. संभाजीनगर उदगीर) असे मयत तरुणाचे नाव आहे. 


अधिक माहितीनुसार, विक्रम बलांडे यांनी 20 नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी आता एक महिन्यानंतर 9 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी मयत तरुणाची लैंगिक आजाराबाबत फेसबूक यूट्यूब, गूगल हॅक करून त्याची खाजगी माहिती काढली आणि त्यास ब्लॅकमेल करून त्याची बदनामी करून, त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


यांच्यावर दाखल केला गुन्हा... 


या प्रकरणात प्रसाद मोरे, शैलेश मारवाडे, रणवीर नटकरे, कौस्तुभ पवार, अभिषेक सताळे, अरविंद खोलगाडगे, सचिन खोलगाडगे, ममता खोलगाडगे, अमोल कचरे (सर्व रा. उदगीर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सत्यशीला राजेंद्र बलांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केली आहे. तर या सर्व आरोपीविरुद्ध गु. र. नं. 697/23 कलम 306, 34 भा. दं. वि. प्रमाणे आणि सहकलम अनु जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम कलम 3 (2) (5) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत हे करीत आहेत.


एक महिन्यानंतर गुन्हा दाखल...


लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील संभाजीनगरमध्ये राहणारा विक्रम राजेंद्र बलांडे याचे फेसबूक यूट्यूब, गूगल हॅक करून आरोपींनी त्याच्या लैंगिक आजाराबाबत खाजगी माहिती काढली होती. तसेच त्याची हीच माहिती व्हायरल करून त्याला बदनाम करण्याची धमकी आरोपींनी दिली होती. त्यामुळे  विक्रमने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणात सुरवातीला आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, मयत तरुणाच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांनंतर आणि मयत तरुणाने लिहून ठेवलेल्या सुसाइड नोटवरून अखेर पोलिसांनी या प्रकरणात 9 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मनोज जरांगेंच्या सभेच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या; सुसाईड नोट लिहून ठेवली