कोल्हापूर : गुडघाभर खड्ड्यातून वाट काढून थकलेल्या कोल्हापूरकरांच्या (Kolhapur News) सुरक्षित प्रवासासाठी कोल्हापुरातील लेकी खारीचा वाटा घेत सरसावल्या आहेत. शहरवासियांच्या रस्ते सुरक्षेसाठी प्रशासनाने काळजी घेणं अपेक्षित असताना स्वत:साठी मिळालेल्या पाॅकेट मनीतून रस्ता 90 अंशात वळणाऱ्या ठिकाणी कॉन्वेक्स मिरर बसवण्याचे ड्रीम घेऊन अवघ्या 5 जणींची टीम काम करत आहे. या सर्व महाविद्यालयीन तरुणी असून त्यांच्या अभिनव संकल्पनेचे कौतुक करण्यात येत आहे. याच मुलींनी समाजभान जपताना कोरोना महामारीमध्येही सीपीआर हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची नाष्ट्याची सोय केली होती.
कोरोना काळात सीपीआरमध्ये नाष्टा दिला, आता कॉन्वेक्स मिरर
कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या मंगळवार पेठ येथील बालगोपाल तालीम चौक परिसरात या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा 15 ऑगस्ट रोजी आमदार सतेज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला. कोल्हापूर शहरात सहा ठिकाणी 90 डिग्री वळण घेताना येणारी वाहने न दिसल्यामुळे बरेच अपघात झाले आहेत. कोरोना काळात सीपीआर हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची नाष्ट्याची सोय याच ड्रिम टीमने केली होती. आपल्या पॉकेटमनीमधून करणाऱ्या अर्पिता राऊत, श्रुती चौगुले, श्रेया चौगुले, नेहा पाटील यांच्यासह पाच तरुणींनी पुन्हा एकदा स्वखर्चातून कोल्हापुरातील वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी राबविलेला हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे.
वाहतूक सुरक्षित आणि विनाअपघात व्हावी
कोल्हापूर शहरातील वाहतूक सुरक्षित आणि विनाअपघात व्हावी यासाठी ड्रीम तुमच्या तरुणी सरसावल्या आहेत. या तरुणींनी पॉकेट मनीमधून शहरात कॉन्वेक्स मिरर बसवले आहेत. कोल्हापूर शहरात अनेक ब्लाइंड स्पॉट आहेत, त्यामुळे रस्ता 90 अंशात वळणाऱ्या ठिकाणी कॉन्वेक्स मिरर बसवण्यात आले आहेत. कोल्हापूर शहरात सुरुवातीला 6 ठिकाणी हे मिरर बसवले आहेत. त्यासाठी स्वतःच्या खर्चातील पैशात या तरुणींनी बचत केली आहे. सुरक्षेसाठी खारीचा वाटा उचलत वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सकारात्मक काम या तरुणींच्या हातून होत आहे.
रितसर परवानगी घेत उपक्रम
कॉन्वेक्स मिरर बसवलेल्या ठिकाणी 90 डिग्रीमध्ये वळण घेताना अचानक येणारी वाहने न दिसल्याने बरेच अपघात झाले आहेत. हे अपघात मोठे नसले, तरी यामधे कायमची शारीरिक इजा आणि आर्थिक नुकसान झालेल्यांचे प्रमाण जास्त आहे. या उपक्रमासाठी महानगरपालिका, कोल्हापूर पोलिस वाहतूक शाखेकडून रितसर परवानगी घेतली आहे.
एका मिररचा खर्च सरासरी सहा हजार
पाॅकिटमनीतून बचत करून कोल्हापूर शहरात सहा ठिकाणी मिरर बसवण्यात आले आहेत. यामधील एका मिररला सरासरी सहा हजार रुपये खर्च आहे. त्यामुळे या पाच तरुणींना कोल्हापूरकरांकडून दातृत्व लाभल्यास नक्कीच शहरात असे मिरर सर्वच आवश्यक असलेल्या ठिकाणी लावून पूर्ण होतील यात शंका नाही.
इतर महत्वाच्या बातम्या :