Who is Shoumika Mahadik : महाराष्ट्रातील आघाडीचा दूध संघ अशी ज्याची ओळख आहे, त्या गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणे वादळी ठरली आहे. सत्ताधारी सतेज पाटील, हसन मुश्रीफ गट विरुद्ध महाडिक गट असा सामना आजही बावड्यातील महासैनिक दरबार हाॅलमध्ये रंगला. 


सभेसाठी विरोधक सभासदांना बसण्यास जागा न दिल्याने महाडिक गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ज्या सभासदांनी आम्हाला निवडून दिलं, त्यांच्यासाठी जागा नसेल तर मी मंचावर येणार नाही, असं शौमिका महाडिक म्हणाल्या. तसंच लहान लहान दूध संघ शेतकऱ्यांना दर देत असताना, गोकुळसारख्या मोठ्या दूध संघाला का परवडत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  


दरम्यान, या गदारोळातच गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी सर्वसाधारण सभेची प्रस्तावना सादर केली. यावेळी खालीच उभ्या असलेल्या शौमिका महाडिक यांनी न वाचता बोला, सभासदांच्या डोळ्यात डोळे घालून बोला, अशी घोषणाबाजी केली. एकीकडे मंचावर माजी मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासारखे दिग्गज नेते असताना, शौमिका महाडिक त्यांना भिडत होत्या, प्रश्न विचारत होत्या. 


कोण आहेत शौमिका महाडिक? 


शौमिका महाडिक या भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक हे त्यांचे सासरे तर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे त्यांचे दीर होत. शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचं माजी अध्यक्षपद भूषवलं आहे. त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. 


शौमिका महाडिक या सध्या कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्ष आहेत. 


मागील वर्षी मे महिन्यात गोकुळ दूधसंघाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत महाडिक गटाकडून त्यांनी 43 मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळी शौमिका महाडिक आणि सतेज पाटील-मुश्रीफ गटाच्या अंजना केदारी रेडेकर यांच्यात चुरस झाली होती. शौमिका महाडिक गेल्यावर्षी पहिल्यांदाच गोकुळच्या संचालक म्हणून निवडून आल्या होत्या. तेव्हापासून त्यांनी गोकुळ दूध संघाच्या प्रश्नांवरुन सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 


सभासदांच्या हितांचे प्रश्न विचारणार


दरम्यान, सभा शांततेत पार पडावी, सर्व सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे समर्पक मिळावीत, अशी आमची भूमिका असल्याची प्रतिक्रिया गोकुळच्या संचालिका आणि महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक यांनी मांडली आहे. या सर्वसाधारण बैठकीत सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत तेच आम्ही मांडणार आहोत. वर्षभरात उत्पादक आमच्याकडे आले आहेत. त्यांचेही काही प्रश्न आहेत. साध्या प्रश्नांची व्यवस्थित मिळावीत, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले. 


शौमिका महाडिक यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, सभा शांततेत पार पडावी, सर्व सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे समर्पक मिळावीत, अशी आमची भूमिका आहे. बैठकीत आपण प्रश्न उपस्थित करत नाही, मात्र अशा ठिकाणी उपस्थित करता याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, बोर्डाच्या बैठकीमध्ये मी प्रश्न उपस्थित करत असते, पण मला प्रत्येकवेळी पुढील वेळी कागदपत्रे दिली जातील असे उत्तर दिले जाते. किंबहुना माझ्या लेखी प्रश्नांना सुद्धा उत्तरे मिळालेली नाहीत. त्यामुळे मला मुद्दे बाहेर मांडावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या