Gokul Meeting : गोकुळमधील सत्तांतर आणि तब्बल दोन वर्षानी होत असलेली सर्वसाधारण सभा यामुळे काय होणार? याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याची लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान आज सकाळपासूनच कोल्हापूर जिल्ह्याती कानाकोपऱ्यातून सभासद कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हाॅलमध्ये जमले आहेत.


विरोधकांचे आगमन होण्यापूर्वीच हाॅल भरल्याने त्यांना शेवटच्या रांगेत बसावं लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, शौमिका महाडिक या ठराधारकांसह हॉलमध्ये पोहोचताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे सभासद एकंदरीत चांगलीच वादळी होण्याची शक्यता आहे. शौमिका महाडिक यांनी सभासदांना जागा मिळाली नाही, तर उभारून प्रश्न विचारणार असल्याचे म्हटले आहे. 


सभासदांच्या हितांचे प्रश्न विचारणार


दरम्यान, सभा शांततेत पार पडावी, सर्व सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे समर्पक मिळावीत, अशी आमची भूमिका असल्याची प्रतिक्रिया गोकुळच्या संचालिका आणि महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक यांनी मांडली आहे. या सर्वसाधारण बैठकीत सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत तेच आम्ही मांडणार आहोत. वर्षभरात उत्पादक आमच्याकडे आले आहेत. त्यांचेही काही प्रश्न आहेत. साध्या प्रश्नांची व्यवस्थित मिळावीत, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले. 


शौमिका महाडिक यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, सभा शांततेत पार पडावी, सर्व सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे समर्पक मिळावीत, अशी आमची भूमिका आहे. बैठकीत आपण प्रश्न उपस्थित करत नाही, मात्र अशा ठिकाणी उपस्थित करता याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, बोर्डाच्या बैठकीमध्ये मी प्रश्न उपस्थित करत असते, पण मला प्रत्येकवेळी पुढील वेळी कागदपत्रे दिली जातील असे उत्तर दिले जाते. किंबहुना माझ्या लेखी प्रश्नांना सुद्धा उत्तरे मिळालेली नाहीत. त्यामुळे मला मुद्दे बाहेर मांडावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.


आम्ही सभासदांच्या हिताचे साधे प्रश्न विचारणार आहोत. त्या प्रश्नांची साध्या आणि सहज शब्दात उत्तर द्यावी इतकीच आमची अपेक्षा आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच सत्ताधाऱ्यांनी सभासदांना प्रवेश दिला आहे. त्यामुळे आमचे सभासद मागे बसतात की काय अशी शक्यता निर्माण झाल्याचे त्या म्हणाल्या.