Gokul Meeting : गेल्या पंधरा दिवसांपासून होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे गोकुळची आज होणारी 60 वी सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी होण्याची शक्यता आहे. गोकुळची सर्वसाधारण सभा दुपारी एक वाजता बावड्यातील महासैनिक दरबार हॉलमध्ये होत आहे. सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईपर्यंत सभा चालवण्याचा निर्धार सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. 


या सभेसाठी तगडा बंदोबस्त पोलिसांकडून तैनात करण्यात आला आहे. जवळपास 200 पोलिस तसेच गोकुळचे सुरक्षा रक्षक या सभेसाठी तैनात असतील. ओळखपत्राशिवाय सभेसाठी कोणालाहील एन्ट्री दिली जाणार नाही. सकाळपासून सभासद जमण्यास सुरुवात झाली आहे. 


गोकुळच्या सभेसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून विरोधकांकडून झालेले आरोप प्रत्यारोप त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांनी दिलेलं उत्तर त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.  गोकुळमधील वाढलेल्या साडेचारशे दुधसंस्था व त्याच्यावरून झालेले आरोप प्रत्यारोप, महालक्ष्मी कारखान्याचे विस्तारीकरण, सौरऊर्जा प्रकल्प उभारणीस मंजुरी आदी मुद्यांवरून सभा वादळी होण्याची शक्यता आहे.  


गेल्या पंधरा दिवसांपासून गोकुळच्या सभेवरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून प्रश्नांची आणि आरोपांची सरबत्ती केली जात आहे. हे राजकीय आरोप सुरु असतानाच दहीहंडीपासून  रामायण महाभारत सुद्धा आल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली आहे. दुसरीकडे विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी प्रश्नांचा भडिमार  केला जाणार आहे. महाडिक गटाकडून खासदार धनंजय महाडिकही सभेसाठी हजर असणार आहेत. 


धनंजय महाडिकांडून सतेज पाटील लक्ष्य!


दहीहंडी कार्यक्रमापासून खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik on Gokul) आणि सतेज पाटील (Satej Patil in Gokul) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. गोकुळ सभेच्या पार्श्वभूमीवर बोलताना धनंजय महाडिक यांनी पुन्हा एकदा सतेज पाटील यांना लक्ष्य केले. गोकुळची वाटचाल शेतकरी संघाकडे होत चालल्याचा आरोप त्यांनी केला. वाढलेल्या 450 संस्था केवळ दप्तरी असून सत्ताधाऱ्यांनी असे करू नये, शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत असे त्यांनी नमूद केले.