Vishalgad Fort : विशाळगडवर अखेर बकरी ईदची कुर्बानी देण्यास परवानगी, स्थानिक आणि गडावर जाणाऱ्या भक्तांनाही कुर्बानी देता येणार
Vishalgad Bakri Eid : गेल्या वर्षी उरुसाच्या वेळी फक्त स्थानिकांना कुर्बानी देण्याची परवानगी देण्यात आली होती. आता स्थानिक आणि भक्तांनाही ही परवानगी मिळाली आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर (Vishalgad Fort) बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. येत्या 7 आणि 8 जून रोजी नियम, अटींचे पालन करून कुर्बानी देण्यास परवानगी देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे विशाळगडवर जाणाऱ्या सर्वच भक्तांना अशी कुर्बानी देता येणार आहे.
गेल्या वर्षी विशाळगडवर झालेल्या वादामुळे अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत आला होता. त्या पार्श्वभूमीवर ईदच्या कुर्बानीची परवानगी मिळणार की नाही याबद्दल साशंकता होती. ईदच्या दिवशी विशाळगडवर कुर्बानीची परवानगी मिळावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याला आता परवानगी देण्यात आली आहे.
Vishalgad Bakri Eid : स्थानिकांना आणि भक्तांना परवानगी
गेल्या वर्षी 14 जुलै रोजी विशाळगडवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरुन दंगल घडली होती. त्यानंतर काही काळ या गडावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली. नंतरच्या काळात या ठिकाणी कुर्बानी देण्यावरही नियंत्रण आलं. गेल्या वर्षी विशाळगडवर जो उरुस झाला त्यावेळी फक्त स्थानिकांनाच कुर्बानी देण्याची परवानगी देण्यात आली होती.
या वर्षीच्या ईदच्या निमित्ताने विशाळगडावर कुर्बानीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी हायकोर्टाकडे करण्यात आली होती. त्यावर हायकोर्टाने ही परवानगी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे फक्त स्थानिकांनाच नव्हे तर ईदनिमित्त विशाळगडवर येणाऱ्या भाविकांनाही कु्र्बानी देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Animal Slaughter for Bakri Eid : ईदच्या कुर्बानीवरुन वाद
हिंदू सण पर्यावरणपूरक साजरे करा असा सल्ला देणारे बकरी ईद व्हर्च्युअली का साजरी करत नाहीत असा प्रश्न विचारत राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी बकरी ईदच्या कुर्बानीला विरोध केला. यावरुन आता त्यावरून राजकारण पेटलं आहे. नितेश राणे महाराष्ट्र बरबाद करण्याच्या मागे लागलेत अशी टीका अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केली. राणेंच्या या वक्तव्याविरोधात अल्पसंख्याक आयोगाकडे तब्बल 40 तक्रारी आल्याचं प्यारे खान यांनी म्हटलंय. प्यारे खान हे नितेश राणेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार आहेत. देवेंद्र फडणवीस हिंदूंचे नव्हे तर सर्वधर्मीयांचे मुख्यमंत्री आहेत, असं प्यारे खान म्हणाले.
Mira Road News मिरा रोडमध्ये वाद
मिरा रोडमध्ये हायप्रोफाईल सोसायटीत बकरीच्या कुर्बानीवरुन वाद निर्माण झाला आहे. कुर्बानीसाठी बकरी आणली असता काही रहिवाशांनी त्याला विरोध केल्यानं वाद निर्माण झाला. गेल्या वर्षीही मिरा रोडमधील काही सोसायट्यांमध्ये बकरीची कुर्बानी देण्यास विरोध झाला होता.




















