(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून 'यलो' अलर्ट
Kolhapur Rain : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळामुळे कोल्हापूर (Kolhapur Rain) शहराच्या काही भागांसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने रविवारी रात्री हजेरी लावली.
Kolhapur Rain : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळामुळे कोल्हापूर (Kolhapur Rain) शहराच्या काही भागांसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने रविवारी रात्री हजेरी लावली. अवकाळी पावसानंतर पाराही घसरला असून वातावरणात थंडी जाणवत आहे. आज सकाळपासन कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. सिद्धनेर्ली, बामणी, शेंडूर, शंकरवाडी आदी गावांमध्ये पाऊस झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास पाऊस सुरू झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, रविवारी रात्री, करवीर, शाहूवाडी, गडहिंग्लज, आजरा तसेच भुदरगड तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात मोठा पाऊस झाला.
जिल्ह्यात 431 ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरु आहे. मतदानापूर्वी कालचा रविवार हा एकमेव रविवार होता. त्यामुळे सर्वांनीच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोर लावला होता. मात्र, सायंकाळी पाच वाजल्यापासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उत्साहावर पाणी फेरले. अवकाळी पावसाने रबी पिकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी ऊसतोड हंगामावर सातत्याने परिणाम होत आहे. शेतात पाणी साचल्यानंतर तोडणीवर परिणाम होतो.
दरम्यान, मंदोस वादळाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. कोल्हापूरला यलो अलर्ट जारी (IMD issues yellow alert for Kolhapur) करण्यात आला आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ऊसतोड हंगामावर पुन्हा परिणाम झाला असून मजूरांच्या झोपड्यांच्या परिसरातही पाणी साचले आहे. दिलासादायक म्हणजे वातावरणात गारवा असल्याने तोडलेल्या ऊसाचे वजन कमी होत नाही.
गडहिंग्लज, आजरा तसेच भुदरगड तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी
दुसरीकडे गडहिंग्लज तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. शहर परिसरासह तालुक्यात ठिकठिक़ाणी अवकाळी पाऊस झाला. हरभरा, ज्वारी आदी पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. सध्या सर्वत्र ऊस तोडणी सुरू आहे. या पावसाने ओल तयार होणार असल्याने तोडणीत व्यत्यय येणार आहे. आजरा तालुक्यातही अवकाळी पाऊस झाला. निवडणुका लागलेल्या गावात प्रचार फेरी, भेटीगाठी सुरू आहेत, पण आज झालेल्या अवकाळी पावसाने रविवार असूनही उत्साहावर पाणी फेरले. भुदरगड तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.
इतर महत्वाच्या बातम्या