Kolhapur District Assembly Constituency : राज्यातील आणि केंद्रातील सत्ता एकीकडे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकनियुक्त प्रतिनिधी एका बाजूला असेच चित्र आजवर कोल्हापूर जिल्ह्याचं राहिलं आहे. 2014 देशात मोदी लाट असतानाही कोल्हापूरमध्ये मात्र तेव्हा राष्ट्रवादीतून धनंजय महाडिक खासदार झाले होते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या पॅटर्नची नेहमीच चर्चा होते. मात्र, 2024 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र पूर्णतः पालटलं आहे. जो जिल्हा पुरोगामी विचारांचा, विचारसरणीचा मांडणी करत होता त्याच जिल्ह्यामध्ये महायुतीने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची धुळदाण उडवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील 10 पैकी 10 विधानसभा जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा पार सुपडासाफ झाला आहे. ज्या जिल्ह्यामध्ये कमळ फुलं नव्हतं त्याच जिल्ह्यामध्ये या निवडणुकीमध्ये दोन भाजप आमदार झाले आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेनं सुद्धा जोरदार कमबॅक करताना तीन जागा पटकावल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि भाजपची वापसी झाली आहे.
आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने सुद्धा दोन जागा पटकावत बाजी मारली आहे. शिरोळमधील राजेंद्र पाटील महायुतीचे पुरस्कृत उमेदवार आहेत. चंदगडमध्ये बंडखोरी केलेले शिवाजी पाटील हे सुद्धा भाजपचेच होते. त्यामुळे त्यांनी निवडणूक जिंकताच भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे जिल्ह्यामध्ये महायुतीचे 10 आमदार झाले आहेत.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोल्हापूर सत्तेत!
जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आता महायुतीची सत्ता असणार आहे. इतकेच नव्हे तर केंद्रामध्ये सुद्धा महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर शहराचे प्रश्न आता तरी सुटणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीपासून ते पूर्णतः पायाभू सविधांपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याचा विकास रखडला गेला आहे. कोल्हापूर हद्दवाढ, खंडपीठ, पोलिस आयुक्तालय, पंचगंगा नदी प्रदुषण, कोल्हापूर मनपाची स्वत:ची इमारत, कोकण रेल्वे कोल्हापूर जोडण्यापासून ते कोणताही मोठा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरमध्ये आलेला नाही. कोल्हापूरच्या इंडस्ट्रियल जगताला देशातील ऑटोमोबाईल सेक्टरचा प्राण समजाला जातो, त्याच ऑटोमोबाईल सेक्टरचा प्राण घुटमळत आहे. त्यामुळे सातत्याने कोल्हापूरच्या उद्योजकांकडून मोठा उद्योग कोल्हापूरसाठी आणावा, अशी मागणी केली जात आहे.
पाणंदीचे रस्ते बरे असे म्हणायची वेळ आली
कोल्हापूर शहराच्या रस्त्यांची अवस्था इतकी भयानक झाली आहे की पाणंदीचे रस्ते बरे असे म्हणायची वेळ आली आहे. शंभर कोटींच्या रस्त्यांचा बागलबुवा करण्यात आला. मात्र, कोल्हापूर शहरातील अवघ्या काही किलोमीटरचे रस्ते त्या 100 कोटींमधून होणार आहेत. कोल्हापूर शहरांमध्ये जवळपास छोटे-मोठे रस्ते मिळून 1053 किलोमीटरचे रस्ते आहेत. थोडेफार अपवाद वगळल्यास कोल्हापूर शहरातील पूर्ण रस्त्यांची वाताहात झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या आमदारांकडून कोल्हापूर शहरासाठी भरीव निधी आणून कोल्हापूर शहराची रस्त्यांपासून सुटका केली जाणार का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे.
अंबाबाई मंदिर, जोतिबा विकास आराखडा, इचलकरंजी टेक्स्टाईल पार्क, ड्रायपोर्ट हे सुद्धा मुद्दे आहेत. कोल्हापूर शहराला असलेली भौगोलिक सखलता लक्षात घेत महायुतीच्या आमदारांकडून कोल्हापूर सांगली सातारा हा इंडस्ट्रीयल कॉरिडोर कसा होईल याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. कोल्हापूरमधील इंडस्ट्रीज एरिया आहेत त्याची क्षमता संपल्याने नव्याने औद्योगिक वसाहत उभारण्याची सुद्धा गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे भुदरगड, गडहिंग्लज तालुका असेल किंवा राधानगरी तालुका असेल अशा ठिकाणी नव्याने औद्योगिक वसाहती निर्माण केल्यास तर त्याचा मोठा परिणाम जिल्ह्याच्या विकासासाठी होणार आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या औद्योगिक वसाहती तत्वत: मान्यता दिली आहे. त्याचा पाठपुरावा करण्याचे काम या आमदारांकडे असणार आहे. मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत अजूनही सुरू झालेली नाही. आहे ती फक्त कोल्हापूर ते पुणे या मार्गावर आहे. या संदर्भात प्रय़त्न करण्याची गरज आहे.
इतर महत्वाच्या बातम्या