कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये जसा महायुतीने मतांचा विक्रम केला तसाच पराक्रम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा घडून आला. जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडतं त्याचा संदेश राज्यामध्ये दिला जातो, असे नेहमीच म्हटले जाते आणि महायुतीच्या विजयामध्ये सुद्धा तसेच घडून आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवारांनी विजय खेचून आणला. या सर्व विजय उमेदवारांची मतदानाची टक्केवारी सरासरी 51 ते 54 टक्क्यांच्या घरात राहिली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीच्या उमेदवारांना एकहाती साथ दिल्याचे दिसून येत आहे. मात्र, पोस्टल मतदानामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारल्याचं दिसून येत आहे. पोस्टल मतदानामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात दहा पैकी सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पोस्टल मतदान सर्वाधिक मिळालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात समरजितसिंह घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटील यांना सर्वाधिक पोस्टल मते मिळाली आहेत. मात्र, घाटगे यांचा कागलमध्ये निकराच्या लढतीत पराभव झाला, तर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव झाला. 


समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक मते 


कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पोस्टर मते कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समरजीतसिंह घाटगे यांना मते मिळाली आहेत. समरजित घाटगे यांना पोस्टल मतदानामध्ये 1 हजार 739 मते मिळाली आहेत. त्यांचे कट्टर विरोधक हसन मुश्रीफ यांना 1441 मते मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर दक्षिणचे काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांचा समावेश आहे. त्यांना 1606 मते मिळाले आहेत. भाजप उमेदवार अमल महाडिक यांना 899 मते मिळाली आहेत. त्यामुळे जवळपास दुप्पट पोस्टल ऋतुराज पाटील यांना मिळाली आहेत. 


राहुल पाटील आणि राजूबाबा आवळे यांनाही सर्वाधिक पोस्टल मते 


दरम्यान, राज्यातील सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये झाले होते. करवीरमद्ये 84.96 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागून राहिलं होतं. या मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणली. त्यांना पोस्टल मते 983 मिळाली. मात्र पोस्टल मतांमध्ये पराभूत राहुल पाटील यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येते. त्यांना 1483 मते मिळाली आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये राजू बाबा आवळे यांना सर्वाधिक 643 मते मिळाली आहेत. त्यांचे विरोधक अशोकराव माने यांना 564 मते मिळाली आहेत.सुजित मिणचेकर यांना 185 मते मिळाली आहेत.  


प्रकाश आबिटकर, विनय कोरे, राहुल आवाडेंची दोन्हीकडे आघाडी  


इचलकरंजीमध्ये पोस्टल आणि ईव्हीएम अशा दोन्ही ठिकाणी राहुल आवाडे यांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. राहुल आवाडे यांनी जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय खेचून आणतानाच पोस्टल मतांमध्येही त्यांना सर्वाधिक 497 मते मिळाली. त्यांच्या विरोधातील मदन कारंडे यांना पोस्टल मतदानामध्ये 479 मतदान झालं आहे. राजेंद्र पाटील यांनी सुद्धा शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठा विजय मिळवला. मात्र, पोस्टल मतदानामध्ये गणपतराव पाटील सरस ठरले आहेत. त्यांना 972 मते मिळाली. उल्हास पाटील यांना 200 मते मिळाली.  शाहूवाडी मतदारसंघांमध्ये विनय कोरे यांनी पोस्टल मतदानामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येते. पोस्टल मतदानामध्ये विनय कोरे यांना 1250 मते मिळाली तर विरोधातील ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील यांना 1044 मते मिळाली. राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्येही प्रकाश आबिटकर यांनी पोस्ट आणि ईव्हीएम अशा दोन्ही ठिकाणी आघाडी घेत विजय खेचल्याचे दिसून येते. आबिटकर यांना पोस्टलमध्ये 1671 मते मिळाली. के पी पाटील यांना 1434 मते मिळाली. बंडखोर उमेदवार ए वाय पाटील यांना 214 मते मिळाली.  चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये नंदिनी बाभूळकर यांना 772 मते मिळाली. बंडखोरी करून विजय मिळवलेल्या शिवाजी पाटील यांना 601 मते मिळाली. आमदार राजेश पाटील यांना 645 मते मिळाली, तर अप्पी पाटील यांना 172 मते मिळाली. 


कोल्हापुरात १० पैकी 7 मतदारसंघात पोस्टल मतांमध्ये मविआचे उमेदवार आघाडीवर, EVM मध्ये पिछाडीवर  


कोल्हापूर दक्षिण 


ऋतुराज पाटील - १६०६ (मविआ)
अमल महाडिक - ८९९  (विजयी)
--------- 
कागल 
हसन मुश्रीफ - १४४१ (विजयी)
समरजीत घाटगे - १७३९ (मविआ)


---------
चंदगड 


नंदाताई बाबुळकर - ७७२ (मविआ)
राजेश पाटील - ६४५
शिवाजी पाटील - ६०१ (विजयी) 
-------------
करवीर 


राहुल पाटील - १४८३ (मविआ)
चंद्रदीप नरके - ९८३ (विजयी)


---------------


कोल्हापूर उत्तर


राजेश क्षीरसागर - ६१५ (विजयी)
दिलीप मोहिते -  ७२४
राजेश लाटकर - ३ (अपक्ष- मविआ)


---------


शाहूवाडी 


सत्यजीत पाटील - १०४४ (मविआ)
विनय कोरे - १२५० (विजयी)
------


हातकणंगले 


राजू आवळे - ६४३ (मविआ)
अशोक माने - ५६४ (जनसुराज्य - विजयी)
---------


इचलकरंजी 


मदन कारंडे - ४७९ (मविआ)
राहुल आवाडे - ४९७ (विजयी)
-------


शिरोळ 


गणपत पाटील - ९७२(मविआ)
राजेंद्र पाटील - ८९९ (विजयी) 


इतर महत्वाच्या बातम्या