Raju Shetti : वाढत्या महागाईविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज इचलकरंजी प्रांत कार्यालयावर धडक जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. महागाईने त्रस्त असलेल्या महिलांचा या मोर्चामध्ये सहभाग लक्षणीय होता. महागाईने कळस गाठला असून यावर विरोधक सुद्धा जाब विचारत नसल्याची खंत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. सर्वसामान्य नागरिकांच्या मुद्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्ष करत असल्याची टीका देखील राजू शेट्टी यांनी केली. राजू शेट्टी म्हणाले की, महागाईने कळस गाठला असून यावर विरोधक सुद्धा जाब विचारत नाहीत. त्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. कोल्हापुरात सुरू झालेला महागाई विरोधातील हा मोर्चा आता संपूर्ण राज्यभर सुरू होईल. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी तातडीने महागाई उपाययोजना करण्यात यावी. 


इचलकरंजीच्या राजवाडा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. तेथून हा मोर्चा हा प्रांत कार्यालयावर धडकला. रणरणत्या उन्हात निघालेल्या मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महागाई नियंत्रणात आणा अन्यथा जनता तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देण्यासाठी आजचा मोर्चा असल्याचे शेट्टी म्हणाले. 






तरीही एवढ्या महाग दरात खते का घ्यावी लागतात? 


ते पुढे म्हणाले की, महागाईने जनता होरपळून निघाली आहे. पेट्रोल डिझेलने शंभरी गाठली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या असतानाही पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी का होत नाहीत? गॅसचा दर नियंत्रणात का आणला जात नाही? आंतरराष्ट्रीय बाजारात रासायनिक खतांच्या किंमती 50 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत, तरीही एवढ्या महाग दरात खते का घ्यावी लागतात? महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. तरीही सरकार, विरोधी पक्ष लक्ष द्यायला तयार नाही, याची आम्हाला खंत वाटते. 


राजू शेट्टी यांनी गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मोर्चे आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंकसाठी आकारण्यात येत असलेल्या हजार रुपयांवरूनही त्यांनी केंद्र सरकावर सोशल मीडियातून हल्लाबोल केला आहे.    






इतर महत्वाच्या बातम्या