Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात मिळालेला दिलासा कायम आहे. हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी 5 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत मुश्रीफ यांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम असेल. ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. 


मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने मुश्रीफ यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांची सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्जपुरवठा प्रकरणात चौकशी सुरु आहे. ईडीकडून मुश्रीफांविरोधात 35 कोटींचा मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर तीनवेळा ईडीकडून छापेमारी झाली आहे. ईडीकडून करण्यात येत असलेले सर्व दावे हसन मुश्रीफ यांच्याकडून फेटाळून लावण्यात आले आहेत. राजकीय सुडापोटी आपल्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून विरोधकांना संपविण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचे त्यांनी अटकपूर्व जामीनात म्हटले आहे. मात्र, ईडीने राजकीय कारणांसाठी वापर होत असल्याचा मुश्रीफांचा आरोप फेटाळून लावला आहे.


कोल्हापुरात मुश्रीफांविरोधात 108 तक्रारी दाखल


मुश्रीफांविरोधात कोल्हापूर आणि मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कोल्हापूरमध्ये त्यांच्या विरोधात 108 तक्रारी दाखल झाल्या असून या प्रकरणांचा तपास कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात येत आहे. दरम्यान कोल्हापुरात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर 24 एप्रिलपर्यंत त्यांना दिलासा मिळाला होता.  या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयातून त्यांना दिलासा मिळतो की नाही? याकडे लक्ष आहे. जर मुंबई उच्च न्यायालयातून त्यांना दिलासा मिळाला नाही, तर मुश्रीफांवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या :