Kolhapur News : गेल्या पाच दिवसांपासून जंतरमंतरवर भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात देशातील कुस्तीपटूंचे जंतरमंतरवर आंदोलन सुरु आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोप होऊनही त्यांच्यावर मोदी सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे देशातील महिला कुस्तीपटू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या आहेत.  


या सर्व पार्श्वभूमीवर भाजपच्या बाहुबली खासदाराविरोधात कोल्हापुरातील (Kolhapur) रणरागिणींनी दंड थोपटले आहेत. त्यांना कोल्हापुरात येऊ न देण्याची भूमिका राजमाता जिजाऊ ब्रिगेड आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे बृजभूषण यांना विरोध वाढताना दिसून येत आहे. कोल्हापुरात सुरु असलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी बृजभूषण सिंह यांना आमंत्रित केल्याने महिला थेट खासबाग मैदानात दाखल झाल्या. स्पर्धेच्या आयोजक असलेल्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांना त्यांनी बदलण्याची मागणी केली. मात्र, आयोजकांनी त्यांना दाद दिली नाही. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलक सीमा पाटील, गीता हासुरकर यांच्यासह अन्य महिलांना मैदानाबाहेर नेले. 


महिला कुस्तीपटूंची कारवाईची मागणी 


दरम्यान, 18 जानेवारी 2023 रोजी कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह 30 कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले होते. आंदोलनात सामील झालेल्या सात कुस्तीपटूंनी भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण सिंह यांनी राष्ट्रीय शिबिरात महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. याची चौकशी करण्यासाठी दोन समित्याही स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यावेळी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून कुस्तीपटूंनी विरोध संपवला होता. मात्र, याप्रकरणी कोणतीही कारवाई न झाल्याने भारतीय कुस्तीपटूंमध्ये नाराजी आहे. 


गेल्या 23 एप्रिलपासून हे भारतीय कुस्तीपटू पुन्हा एकदा जंतरमंतरवर निदर्शने करत आहेत. राजकीय पक्षांचे नेते, माजी राज्यपाल, ऑलिम्पियन आणि अनेक संघटनांचे नेते कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. यामध्ये आज हरियाणा आणि पश्चिम यूपीच्या खाप पंचायतींचे नेते मोठ्या संख्येने कुस्तीपटूंना भेटणार आहेत. दिल्ली पोलिसांनी भाजप खासदारावर गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी कुस्तीगीरांची मागणी आहे. यासोबतच समितीचा अहवालही सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. 


VIDEO : Kolhapur : कुस्तीच्या पंढरीत येऊ देणार नाही,Brij Bhushan Sharan Singh यांना कोल्हापूकर महिलांचा विरोध



इतर महत्वाच्या बातम्या