Rajaram Sakhar Karkhana : फक्त कोल्हापूर जिल्हा नव्हे, तर अवघ्या पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचे लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाडिकांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या एकमेव संस्थेवर निर्विवाद वर्चस्व विरोधी सतेज पाटील गटाचा पार धुव्वा उडवला. प्रचाराचा घसरलेला दर्जा, दोन्ही गटाकडून एकेरी शब्दांचा सर्रास वापर आणि हा वाद थेट बिंदू चौकात आल्याने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले.
कोल्हापुरात सलग निवडणुका जिंकण्याचा पराक्रम आणि भाजपला जिल्ह्यात पायही ठेवू न देणाऱ्या सतेज पाटील यांना इतक्या दारुण पराभवाला सामोरे का जावे लागले? कारखान्यासाठी 2015 पासून जीव तोडून मशागत करत असूनही नेमकी कोणती चूक झाली? याचीही चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे. मात्र, सतेज पाटलांनी कारखान्याचे मैदान मारायचेच या जिद्दीने दिलेली एकाकी लढत उल्लेखनीय असली, तरी राज्यातील सत्तांतरापासून घडलेल्या नाट्यमय घडामोडी आणि मुन्ना महाडिकांना भाजपकडून मिळालेली राज्यसभेची खासदारकी 'राजाराम'च्या निकालात टर्निंग पॉईंट ठरला आहे. सत्तांतरानंतर सतेज पाटलांनी केलेल्या मशागतीच्या विरोधात फासे पूर्णत: उलटे पडत गेले.
महाडिकांची कधी नव्हे ती या निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट परफेक्ट दिसून आली. 29 उमेदवारांना पोटनियमांतील तरतुरदीमधून अवैध ठरवल्याने हा झटका सतेज पाटलांना ऐन निवडणुकीत जिव्हारी लागणारा होता. त्यामुळे सतेज पाटील गटाचे तगडे उमेदवार रिंगणातून बाहेर गेले आणि त्याचा फटकाही बसला.
मुन्ना महाडिकांची खासदारकी अन् राज्यातील सत्तांतर 'राजाराम'चा टर्निंग पॉईंट
सतेज पाटील यांनी वैयक्तिकपणे लक्ष घालत कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील 1899 सभासदांना अपात्र करण्यात मोठी भूमिका बजावली होती. दुसरीकडे, याच मुद्यावरुन अमल महाडिक यांच्याकडून या सभासदांसाठी न्यायालयीन लढाई सुरु केली. हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. अखेर न्यायालयीन लढाईत हे सभासद निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा पात्र ठरल्याने 'राजाराम'च्या निवडणुकीचा निकाल काय असेल? याचा अंदाज आला होता. सतेज पाटील यांचा सभासद अपात्र करण्यासाठी संघर्ष सुरु असताना ते महाविकास आघाडीमध्ये राज्यमंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे सत्तेचं आणि मंत्रिपदाचे बळ असल्याने त्यांची लढाई तुलनेत सोपी झाली होती. दुसरीकडे, महाडिक गट राजकीय वनवासात होता. काहीच राजकीय हालचाल होत नसल्याने कार्यकर्तेही निराश झाले होते. गोकुळ सुद्धा काढून घेत महाडिकांचे वर्चस्व पूर्णत: सतेज पाटलांनी मोडून काढले. सतेज पाटलांनी दिलेल्या सलग राजकीय हादऱ्यांनी महाडिक गट पार गुलालाला मुकला होता.
महाडिकांच्या खासदारकीने चित्रच पालटले
जून 2022 मध्ये राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कोल्हापूर झाला होता. राज्यसभा निवडणुकीमुळे कोल्हापूर देशाचे केंद्रबिंदू होऊन गेला. संभाजीराजेंना नाकारलेली उमेदवारी, त्यानंतर शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख संजय पवारांसारख्या निष्ठावंताला दिलेली उमेदवारी आणि भाजपने संधी नसतानाही कोल्हापूरच्याच धनंजय महाडिकांना रिंगणात उतरवून केलेली खेळी यामुळे कोल्हापूर जिल्हा चर्चेत होता. या निवडणुकीत धनंजय महाडिक खासदार झाले आणि त्यानंतर 10 दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारही कोसळले. यानंतर खऱ्या अर्थाने महाडिक पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीला हादरा देण्यासाठी महाडिकांशिवाय पर्याय नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी अचूक हेरताना महाडिकांना बळ देण्यास सुरुवात केली. चंद्रकांतदादा पाटील यांनीही महाडिकांना तोलामोलाची साथ दिली. मात्र, आज कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजेच महाडिक अशी स्थिती आहे. चंद्रकांतदादा यांचे खंदे समर्थकही अडगळीत पडले आहेत.
सत्तांतराने सतेज पाटलांची ताकद मर्यादित
धनंजय महाडिक खासदार होताच जिल्ह्यात महाडिक गट सक्रिय झाला. त्यामुळे त्यांच्यासमोर राजाराम कारखाना हेच त्यांचे पहिले टार्गेट होते. त्यामुळे देशातील पहिल्या सहकार खात्याचे प्रमुख असलेल्या अमित शाह यांची ताकदही महाडिकांच्या कामी आली असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. गेल्या सहा महिन्यांपासून भाजपकडून जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी भाजपने जय्यत तयारी सुरु केली आहे. या टप्प्यात अमित शाह, नितीन गडकरी, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारख्या तगड्या नेत्यांनी कोल्हापूर दौरा केला आहे. त्यामुळे महाडिक गटाला कोल्हापूर ते थेट दिल्ली राजकीय पाठबळ लाभल्याने राजारामची लढाई सोपी करण्यात यश आले. निवडणुकीत अपात्र सभासद पुन्हा पात्र आणि ऐन निवडणुकीत सतेज पाटील गटाचे एका दणक्यात 29 अवैध उमेदवार हाच केंद्रबिंदू ठरला. निवडणुकीतील वाढलेले मताधिक्य हाच फरक सांगतो.
सतेज पाटलांचे विरोधक आणि नाराजही एकवटले
'राजाराम'च्या लढाईत हातकणंगले तालुका निर्णायक होता. मात्र, याच तालुक्यातून सतेज पाटलांचे विरोधक आणि नाराजांनी एकत्र येत महाडिकांना बळ दिले. तालुक्यातील आमदार विनय कोरे गट, माने गट, आवाडे गट, स्वाभिमानीची झालेली सभा यामुळे सतेज पाटील एकटे पडले. हे सर्व आज भाजपला सहकार्य करत आहेत. सतेज पाटलांची राजकीय घौडदौड रोखण्यासाठी हे सर्व एकत्र आले आणि महाडिकांच्या मदतीला धावले. अमल महाडिकांनी संयमाने प्रचार करतानाच धनंजय महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी आक्रमक प्रचार केला. 'महाडिक भ्यालेत' या टीकेवरुन त्यांनी त्यांनीही चोख प्रत्युत्तर सभांमधून दिले. सतेज पाटलांकडून सातत्याने ऊसाच्या कमी दराचा उल्लेख झाला, पण तो सभासदांना भावला नसल्याचे दिसून आले.
करवीरमध्ये नाराजी भोवली
नुकत्याच पार पडलेल्या कुंभीच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी सत्ताधारी चंद्रदीप नरके पाटील गटाला उघड पाठिंबा दिला आणि निवडूनही आणले. करवीर आणि गगनबावडा तालुक्यातून निर्णायक ताकद सतेज पाटलांनी दिली. मात्र, याच दोन तालुक्यातून नरके गटाचा 'राजाराम'मध्ये किती फायदा झाला हा संशोधनाचा विषय आहे. दुसरीकडे कुंभीसाठी आमदार पी. एन. पाटील गट विरोधात होता. त्यामुळे त्यांची सतेज पाटलांवरील नाराजी जाहीर होती. राधानगरीमध्येही अपेक्षित साथ लाभली नाही.
विनय कोरेंचा ऐन निवडणुकीत बाॅम्ब
'राजाराम'साठी एकाहाती प्रचार करत असताना महाडिकांकडून होणाऱ्या टीकेला सतेज पाटील उत्तर देत आले. मात्र, आमदार विनय कोरे यांनी केलेल्या गौप्यस्फोटावरुन सतेज पाटील पूर्णत: बॅकफूटवर गेले. त्यांनी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात 'राजाराम'ला विरोध करायचा नाही, असे ठरले होते, असे हातकणंगलेतील सभेत जाहीरपणे सांगितले. यावेळी सतेज पाटील यांचे बंधूही होते असेही ते म्हणाले. एवढा मोठा बाॅम्ब ऐन निवडणुकीत पडूनही सतेज पाटलांनी कोणतीची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे सतेज पाटील आणखी बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले. आमदार महादेवराव महाडिकांच्या टीकेला ज्यांनी ज्या ताकदीने उत्तर दिले, त्याच ताकदीने कोरेंचा आरोप त्यांना खोडून काढता आला नाही.
राजाराममधील पराभवाने सतेज पाटलांना वर्मी घाव बसला, तरी हा राजकीय वाद शमण्याची चिन्हे नसून आगामी सर्व निवडणुकीत दोन्ही गट आमनेसामने असणार आहेत. महाडिकांचे कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यात थेट संपर्क असल्याने भाजपकडून पक्ष वाढवण्यासाठी सातत्याने बळ दिले जाईल, यात शंका नाही. दुसरीकडे, सतेज पाटील यांनाही काँग्रेसने मुख्य प्रवाहात आणताना विधानपरिषदेतील गटनेतेपद तसेच निवडणूक समितीमध्येही स्थान दिले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात हे दोन्ही प्रत्येक निवडणुकीत एकमेकांच्या समोर असतील हे वेगळं सांगायला नको.
इतर महत्वाच्या बातम्या