Rajarshi Shahu Maharaj: लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी पाणीदार कोल्हापूरसाठी (Kolhapur) राधानगरी धरणाचे (Radhanagari Dam) स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण होण्यासाठी ज्या ठिकाणी तळ ठोकला ते म्हणजे बेनझीर व्हिला. तोच बेनझीर व्हिला (Benazir Villa) आज अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. शाहूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या व्हिलाचा श्वास भोवती वाढलेल्या झाडाझुडपांनी श्वास कोंडून गेला आहे. व्हिला बांधल्यापासून आतापर्यंत केवळ ती चारवेळा पाहण्यास उपलब्ध झाली आहे. बेनझीरचा अर्थ एकमेवाद्वितीय किंवा अप्रतिम असा होतो. हे नाव दस्तुरखुद्द राधानगरी धरणाचं स्वप्न पाहणाऱ्या शाहू महाराजांनीच दिलं आहे. यासाठी 1912 मध्ये शासकीय दप्तरी ठराव केल्याची नोंद आहे. 


बेनझीर व्हिला धरणाच्या मध्यभागी


राधानगरी धरणाची निर्मिती होत असताना तेथील कामकाजावर लक्ष ठेवता यावे, तसेच हे धरण पूर्णत्वास लवकर जावे यासाठी स्वत: शाहू महाराजांनी बेनझीर व्हिलाची पायाभरणी करत देखणी आणि अप्रतिम नजारा असलेली जागा निवडली. या व्हिलाची प्रत्येक भिंत महाराजांचा रयतेच्या कल्याणासाठी जो दृढनिश्चय होता त्याची ती साक्षीदार आहे. चुना आणि वाळूमध्ये बांधलेली ही आकर्षक व ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू आहे. 


कसा आहे बेनझीर व्हिला?


राधानगरी लक्ष्मी तलावाच्या मुख्य भिंतीसमोर आणि पाण्याच्या मधोमध एक छोटं बेट तयार झालं आहे. या बेटावरच राजर्षी शाहू महाराजांनी बेनझीर व्हिलाची पायाभरणी केली. ही वास्तू धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्यामध्ये सापडल्याने आजतागायत दुर्लक्षितच राहिली आहे. गेल्या 68 वर्षांमध्ये केवळ चारवेळा ही वास्तू जवळून पाहता आली आहे. राज्यात 1972 मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा पहिल्यांदा बेनझीर व्हिला वास्तू झाली होती. यानंतर असाच बाका प्रसंग 2016 आणि 2019 मध्ये बेनझीर व्हिला खुला झाला. यानंतर यंदा भीषण परिस्थिती ओढावल्याने ती पुन्हा खुली झाली आहे. व्हिला पाहण्यासाठी उत्तरेकडील किनाऱ्यावरुन राऊतवाडीमधून जावे लागते. 


ज्या उदात्त भावनेने शाहू महाराजांनी या वास्तूची उभारणी केली होती तो उद्देश रयतेसह शेतकऱ्यांच्या कल्याणाचा आणि पाणीदार कोल्हापूरसाठी होता. त्यामुळे धरणाने तळ गाठल्याने ही वास्तू पाहता येत असल्याचा आनंद पर्यटकांना असला, तरी तो सर्वसमावेशक आनंद देणारा नक्कीच नाही. लोकराजाचा उद्देश रयतेच्या घशाला कोरड पडू नये, यासाठी होता, पण आज धरणाने तळ गाठल्याने घसा कोरडा होण्याची वेळ आली आहे. आजतागायत जे महाराजांनी दिलं त्याच शिदोरीवर कोल्हापूर पुढे जात आहे. त्या पलीकडे कोणतीच आश्वासक नवनिर्मिती कोल्हापूरच्या भूमीत झालेली नाही. त्यामुळे महाराजांच्या निश्चयाची प्रतीक असलेला बेनझीर व्हिला जपणं हे आपलं कर्तव्य आहे.


इतर महत्वाच्या बातम्या