Hasan Mushrif: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रम पत्रिकेवरून कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) चांगलीच चर्चा रंगली आहे. कार्यक्रम पत्रिकेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो अपेक्षित असताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झळकल्याने चर्चेचा विषय झाला. त्यामुळे आमदार हसन मुश्रीफ यांनी कार्यक्रम पत्रिकेवरून खुलासा करताना गैरसमज करून घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. ईडी चौकशीचा आणि या जाहिरातीचा काहीही संबंध नाही, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. 


शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांचा विसर?


महाराष्ट्र सरकार आणि हसन मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने गडहिंग्लजमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. यासाठी करण्यात आलेली कार्यक्रम पत्रिका मात्र चांगलीच व्हायरल झाली आहे. या पत्रिकेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री  यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार वगळता महाविकास आघाडीचे अन्य नेते गायब झाल्याने राजकीय भूवया उंचावल्या. त्यामुळे शासन आपल्या दारी कार्यक्रमाची पत्रिकेत शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांचा विसर? पडला की काय अशीच चर्चा जिल्ह्यात रंगली. 28 जून रोजी गडहिंग्लजमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. 




हसन मुश्रीफांनी केला खुलासा 


कार्यक्रम पत्रिकेवरून चर्चा रंगल्यानंतर आमदार हसन मुश्रीफ यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, 'शासन आपल्या दारी'मधील बहुतांशी योजनांचा जन्म मी मंत्री असताना घातला आहे. राजस्व अभियानांतर्गत सरकार या योजना सरकारपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवत होतं. ही योजना कशी राबवली जाते हे राज्याला दाखवून देण्यासाठी हा कार्यक्रम घेतला आह. ही योजना यशस्वी करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे हे मी आधीपासून सांगत आलो आहे. राष्ट्रवादी पक्षामार्फत आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे. महाविकास आघाडीचा यात सवाल नाही. 


मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे घोषणा केली म्हणून त्यांचे फोटो आहेत. राष्ट्रवादी म्हणून पवार साहेब आणि अजित दादांचे फोटो आहेत. त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेण्याची गरज नाही, ईडी चौकशीचा आणि या जाहिरातीचा काहीही संबंध नाही, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, ईडीकडून मुश्रीफांविरोधात 35 कोटींचा मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर तीनवेळा ईडीकडून छापेमारी झाली आहे. तसेच मुरगूड पोलिस ठाण्यात फसवणुकीचेही गुन्हे दाखल झाले आहेत. कारखान्याच्या कर्ज प्रकरणावरून मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या