Kolhapur Crime: अनैतिक संबंध लपवण्यासाठी पोटच्या लेकराचा खून करुन नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवणाऱ्या प्रकरणाचा रायबाग पोलिसांनी उलगडा केला आहे. तब्बल महिन्याभरानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. जन्मदात्या आईनेच नात्यातील तब्बल सात जणांची मदत घेऊन लेकराचा खून केल्याचे समोर आले आहे. आरोपी आईसह तिघांना अटक करण्यात आली असून चौघे फरार आहेत. अटकेतील आरोपींमध्ये कोल्हापूरमधील (Kolhapur News) करवीर तालुक्यातील शिंगणापूरमधील एकाचा समावेश आहे. 


वडिलांच्या संशयाने महिन्यांनी प्रकरण उजेडात


हरिप्रसाद संतोष भोसले (वय 23 वर्षे, रा. रायबाग) असे खून झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. रायबाग पोलिसांनी खुनी आई सुधा उर्फ माधवी संतोष भोसले (रा. रायबाग) हिच्यासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. रायबागमध्ये संतोष भोसले हे पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. सुधाचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मुलगा हरिप्रसादला समजली होती. त्यामुळे अनैतिक संबंधांचा उलगडा होऊ नये, यासाठी थेट मुलालाच संपवण्याचा कट आईने रचला.


नातेवाईकांची मदत घेत मुलालाच संपवले 


आईने पोटच्या मुलाचा खून करण्यासाठी वैशाली सुनील माने (रा. शिंगणापूर, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर), गौतम सुनील माने यांच्या मदतीने मुलगा हरिप्रसादचा गेल्या महिन्यात 28 मे रोजी खून केला. खून केल्यानंतर मुलगा झोपलेल्या जागेवरुन उठत नसल्याचे शेजाऱ्यांना सांगितले. हरिप्रसादच्या अचानक मृत्यूने सर्वांनाच हादरा बसला. बाहेरगावी गेलेल्या वडिलांनाही या घटनेमुळे प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला. परत आल्यानंतर मुलाचा मृत्यू संशयास्पद जाणवला. मुलाचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत त्यांनी रायबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. 


पोलिसांकडून महिन्यात प्रकरणाचा छडा


वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत महिन्याभरात खुनाचा छडा लावला. मुलाच्या खुनात आईने नात्यातील सात जणांची मदत घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. 


बापानेच 75 हजारांची सुपारी देत मुलाचा केला खून


दरम्यान, जन्मदात्या बापानेच सुपारी देत मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात आठवडाभरापूर्वी उघडकीस आली होती. राहुल दिलीप कोळी (वय 31 रा. कोळी गल्ली, तारदाळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. दिलीप कोळी आणि विकास पोवार (दोघे रा. तारदाळ), सतीश कांबळे (रा. तमदलगे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. वडिलांनी 75 हजार रुपयांना सुपारी देऊन दोन साथीदारांसह खून केल्याची कबुली पोलिसांनी दिली. शहापूर पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या