Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट फुटीच्या उंबरठ्यावर? स्वतःच्याच जिल्हाध्यक्षांविरोधात उघडली मोहीम
राधानगरी, आजरा, चंदगड आणि कागल तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्यांनी विजय देवणे यांच्या कार्यपद्धती विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर याबाबत तातडीने पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.

Kolhapur News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (Kolhapur News) शिवसेनेमध्ये पदाधिकारी एका बाजूला आणि नेते एका बाजूला अशी स्थिती झाल्याने स्थिती नाजूक झाली आहे. असे असतानाच आता शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांच्या नाराजीने कोल्हापुरातील उरलासुरला ठाकरे गट फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांच्या विरोधात चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी थेट त्यांनी मातोश्रीवर पोहोचवली आहे.
राधानगरी, आजरा, चंदगड आणि कागल तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्यांनी विजय देवणे यांच्या कार्यपद्धती विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर याबाबत तातडीने पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे. नाराज या पदाधिकाऱ्यांनी सहानुभूतीने विचार करून ग्रामीण भागासाठी ग्रामीण जिल्हाप्रमुख द्यावा अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी बळ द्यावे अशी विनंती करण्यात आली आहे.
मातोश्रीवर खोट्या बातम्या देऊन दिशाभूल केली जात आहे. ग्रामपंचायतीपासून ते नगरपंचायतीपर्यंत कोणत्याही निवडणुका गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. कोणतेही आंदोलन करताना त्यावेळी फक्त पदाधिकारी कार्यकर्ते यांना घेऊन त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसोबत तडजोडी करु प्रसिद्धी केल्यानंतर आंदोलन तिथेच संपवला जाते. त्यामुळे स्थानिक पातळीवर केलेली शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख पर्यंतची फळी व प्रत्येक शाखा पूर्णपणे मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्याचा सहानुभूतीने विचार करण्यात यावा, असेही मातोश्रीवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रत्येक तालुक्यात स्वतःच्याच पक्षात गटबाजी वाढवून स्वतःचा स्वार्थ साधत आहेत, त्यांची ग्रामीण भागातील कार्यपद्धती तालुक्यातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांना न पटण्यासारखी आहे. पक्षवाढीसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नसल्याचेही म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेनेत 40 आमदारांनी बंड केल्यानंतर त्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यामध्येही उमटले. जिल्ह्यातून आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी शिंदे गटाशी घरोबा केला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सत्ताधारी शिंदे गटात आणि निष्ठावंत शिवसैनिक दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमधील वादावर उद्धव ठाकरे कसा तोडगा काढतात? याकडे लक्ष आहे. कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाचे तीन जिल्हाध्यक्ष आहेत. यामध्ये विजय देवणे, संजय पवार आणि मुरलीधर जाधव यांचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























