कोल्हापूर : गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला चारशे रुपये आणि यंदाच्या मोसमात 3500 रुपयांच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गेल्या दोन महिन्यांपासून विविध टप्प्यांवर आंदोलन  सुरु होते. आजपासून (23 नोव्हेंबर) बेमुदत चक्काजाम आंदोलनाची घोषणा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली होती. त्यामुळे तब्बल आठ महामार्ग रोखून धरल्यानंतर कारखानदारांनी 100 रुपयांवर तोडगा काढत आंदोलनास माघार घेण्यास सांगितले आणि उसाच्या दराचा तिढा अखेर सुटला.


चक्काजाम संपताच धुडगूस 


दरम्यान, सायंकाळी आंदोलनावर तोडगा काढण्यात आल्यानंतर चळवळीला गालबोट लागल्याचे दिसून आले. अनेक दारुड्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की केली. दिवसभर वार्तांकनासाठी सोबत असलेल्या माध्यम प्रतिनिधींवर चाल करून गेल्याचा प्रकार घडला. आनंद म्हणजे उन्माद नव्हे असे सांगण्याची वेळ यावेळी आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. राजू शेट्टी यांना खांद्यावर उचलून घेताना ते खाली कोसळल्याचाही प्रसंग घडला. 


माध्यम प्रतिनिधींना झालेल्या धक्काबुक्कीची माहिती मिळताच राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. मात्र, त्यांनी आंदोलनात दुसरेच आल्याचा आरोप केला. मात्र, असे म्हणून जबाबदारी टाळता येत नाही, हे सांगण्याची वेळ आली आहे. चळवळीचे आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या अनेक माध्यम प्रतिनिधींकडून चळवळीची शिस्त बिघडल्याची भावना व्यक्त करण्यात आली. 


राजू शेट्टी यांचे आंदोलन 8 तासानंतर संपलं


दुसरीकडे, आमचा गेल्यावर्षीच्या 100 रुपयांचा प्रस्ताव मान्य केला. 9 तास आम्ही महामार्ग रोखला होता.  ज्यांनी तीन हजार पेक्षा कमी दिले होते त्यांनी 100 रुपये द्यायचे आणि ज्यांनी 3000 रुपये दिले आहेत त्यांनी 50 रुपये द्यायचे, हे आम्हला कागदावर पाहिजे असं सांगितलं होतं, तसं पत्र आम्हाला कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी आम्हाला दिलं. 2022-23 हंगामात उसाचा दर प्रतिटन 3 हजार रुपये दिला आहे त्यांनी अतिरिक्त 100 रुपये द्यावे आणि 3000 हजार पेक्षा दर दिलेल्या कारखान्यांनी प्रतिटन 50 रुपये द्यावे, ही सर्व रक्कम पुढील 2 महिन्यात द्यायची आहे, असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व कारखान्यांना सांगितलं असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. 


त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कारखान्यांना पत्र देण्यास सांगितलं आहे. यावर्षी तुटणाऱ्या उसाला ज्यांनी 3000 हजार जाहीर केलं त्यांनी 3100 रुपये देऊ असं प्रश्न जिल्हाधिकारी आणि आम्हाकडे एक प्रत द्यावी. जोपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र देत नाहीत, तोपर्यंत कारखाने सुरू होणार नाहीत. आता आमची नजर सांगली जिल्ह्याकडे आहे. शनिवारी राजाराम बापू कारखान्यावर एकत्र जमायचे आहे, शेतकऱ्यांच्या एकजूटीने कारखानदारांची एकजूट फोडली आहे असेही ते म्हणाले. 


 इतर महत्वाच्या बातम्या