कोल्हापूर : स्वाभिामानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी ऊस लढ्यासाठी रणशिंग फुंकले आहे. 'स्वाभिमानी'कडून आक्रोश पदयात्रेची घोषणा करण्यात आली असून ती यात्रा उद्यापासून (17 ऑक्टोबर) सुरु आहेत. शिरोळ तालुक्यात पदयात्रेचा शुभारंभ होईल. ऊसाचा दुसरा हप्ता प्रतिटन 400 रुपये, राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल केल्याशिवाय ऊस गाळपास परवानगी देऊ नये, या मागणीसाठी पदयात्रा काढण्यात येणार आहे. शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यापासून सकाळी आठ वाजता पदयात्रेला प्रारंभ होणार आहे.


22 दिवस आत्मक्लेश आंदोलन 


दुसरीकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22 वी ऊस परिषद 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ही पदयात्रा गुरूदत्त, जवाहर, घोरपडे, शाहू, वारणा, क्रांती, वसंतदादा, राजारामबापू, आदी 37 साखर कारखान्यांवर 22 दिवस 522 किलोमीटर निघेल. 7 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत ही पदयात्रा सामील होणार आहे. जोपर्यंत 400 रुपयांचा दुसरा हप्ता दिला जात नाही, तोपर्यंत एकाही साखर कारखान्याची ऊस तोड सुरू होणार नाही. त्यामुळे पदयात्रेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदार शेट्टी यांनी केले आहे.


सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी केवळ एफआरपीच दिली आहे. पुणे, अहमदनगर जिल्ह्यात 8 साखर कारखान्यांनी 400 ते 500 रुपये एफआरपीपेक्षा अधिक दिले आहेत. दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची रिकव्हरी पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त आहे, तरीही दुसरा हप्ता देण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे, गेल्या हंगामातील उसाला 400 रूपयांचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना साखर रोखण्याचे आंदोलन करत असल्याने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेली बैठक निष्फळ ठरली. बैठकीत सर्वच साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींनी ऊस उत्पादकांना उत्पन्न वाटप सूत्रानुसार (रेव्ह्यून्यू शेअरींग फॉर्म्युला-आरएसएफ) पैसे देवू असे सांगत 400 रूपये देण्यास नकार दिला. संघर्षाशिवाय शेतकऱ्यांना काहीही मिळणार नसेल तर 400 रूपयांसाठी साखर रोखण्याचे आंदोलन आणखी तीव्र करू, एक कणही साखर बाहेर सोडणार नाही, असा खणखणीत इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 


राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करणार 


दरम्यान, गेल्या गळीत हंगामातील हप्त्याबाबत राजू शेट्टी यांच्या सोबत चर्चा करणार आहे, यातून योग्य तो मार्ग काढला जाईल अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राजू शेट्टी यांच्या पदयात्रे संदर्भात त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, राजू शेट्टी यांनी लेखापालांचे पथक तयार करून कारखान्याची बँक खाती तपासावीत. ज्या कारखान्याच्या खात्यावरील रक्कम सरप्लस आहे, त्या कारखान्यांना जादा दर द्यायला लावू, पण कारखाने कर्जदार असतील तर पुढे काय करायचे हे सांगितले पाहिजे. साखरेचे दर आता वाढले आहेत मात्र कारखान्यावर मोठी चर्चा आहे त्याचाही विचार झाला पाहिजे असे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या