कोल्हापूर : नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस असतानाच कोल्हापूर शहरातील (Kolhapur News) कसबा बावडा परिसरात आज (16 ऑक्टोबर) सकाळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुर्गा दौड मार्गावर टिपू सुलतानचे (Tipu Sultan) उदात्तीकरण करण्याच्या हेतूने आक्षेपार्ह वाक्य लिहिल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) वेळीच कारवाई करत ते वाक्य पुसून टाकले. कोल्हापूर पोलिसांकडून शांततेचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी टिपू सुलतानचा उदात्तीकरण  करण्याच्या हेतूने स्टेटस लावण्याने कोल्हापूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. टिपू सुलतान संदर्भात वाक्य दिसून आल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. 


तीन दिवसात दुसऱ्यांदा प्रकार 


दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कसबा बावड्यात एक तरुणाने टिपू सुलतानचे स्टेटस ठेवल्याने संतप्त झालेल्या जमावाने तरुणाला बेदम मारहाण केली होती. घरावर जोरदार दगडफेक सुद्धा केली. शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती आटोक्यात आली. एका तरुणाने त्याच्या मोबाइलवर टिपू सुलतानाचे स्टेटस ठेवले होते. त्याची माहिती बावड्यातील काही तरुणांना मिळाली. या तरुणास काही तरुणांनी रस्त्यात अडवून मारहाण केली. मारहाण होत असल्याचे पाहून तो तरुण त्याच्या घराच्या दिशेने धावला. तरुणांच्या जमावाने त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा मारहाण केली; तसेच त्याच्या घरावर दगडफेक केली. जमाव मोठ्या संख्येने जमला होता.


पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचताच पोलिस निरीक्षक अरुणकुमार सिंदकर यांच्यासह पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेऊन, स्टेटस ठेवणाऱ्या तरुणास ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर बावडा परिसरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. स्टेटस ठेवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करावा, त्याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी परिसरातील तरुणांनी पोलिसांकडे केली. 


इतर महत्वाच्या बातम्या