(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raju Shetti : हातकणंगलेसह लोकसभेच्या पाच जागा लढविणार; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची घोषणा
लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. मात्र या कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार? त्याचा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.
Raju Shetti : आगामी लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (swabhimani shetkari sanghatana) रणशिंग फुंकण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरणार असून राज्यात हातकणंगलेसह पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. मात्र या कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार? त्याचा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अभ्यास शिबीराच्या सांगता सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राजू शेट्टी यांनी लोकसभेच्या निवडणुकीची माहिती दिली. राजू शेट्टी यावेळी म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो आहेत. भाजपमधून या अगोदरच बाजूला झालो आहोत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष चालू आहे. रस्त्यावरची लढाई आमची संपलेली नाही. केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार हा लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नाही, असे ठणकावून सांगणे गरजेचे आहे.
राजू शेट्टी पुढे म्हणाले की, मी मांडलेला हमीभावाचा कायदा अजून तो प्रलंबित आहे. केंद्र जोपर्यंत हमीभावाचा कायदा करत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यावर कोणत्याच सभागृहात चर्चा केली जात नाही. त्यासाठी शेतकरी प्रश्नावर बोलणारे लोकप्रतिनिधी सभागृहात निवडून जाणे गरजेचे आहे. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, अजित, संदीप राजोबा, सचिन शिंदे, आदी उपस्थित होते.
स्वाभिमानीचा धडक मोर्चा
दरम्यान, शेतीला दिवसा 12 तास वीज मिळावी, वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण व्हावे या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शाहूवाडी तहसील कार्यालयावर मंगळवारी (21 मार्च) धडक मोर्चा नेण्यात आला. यावेळी मोर्चा समोर शासकीय अधिकाऱ्यांना उत्तरे द्यावी लागली. मागण्यांची पूर्तता वेळेत न केल्यास जाब विचारण्यासाठी पुन्हा धडक मोर्चा काढू असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
राजू शेट्टी बोलताना म्हणाले की, वनविभाग जंगलात प्राण्यांसाठी पाणी चाऱ्याची सोय करत नाही. त्यामुळे प्राणी पिकांचे नुकसान करतात, शेतकऱ्यांवर हल्ला करतात. मात्र, नुकसान भरपाई आणि दवाखाना खर्च मिळत नाही. यापुढे संपूर्ण भरपाई मिळावी. वनविभागाने प्राणी शेतात येतात त्याची व्यवस्था करावी. महावितरणने खराब ट्रान्सफॉर्म बदलावेत. चुकीची वीज बिल दुरुस्त करावी ते वीज मोटर द्यावी. रेशन पुरवठ्याबाबत असणाऱ्या तक्रारी आणि पीएम किसानचा लाभ शेतकऱ्यांना वेळेत मिळावा. अधिकाऱ्यांनी मागण्याबाबत दिलेले आश्वासने पाळून वेळेत काम करावे, अन्यथा पुन्हा मोर्चा काढून असा इशारा त्यांनी दिला.
महत्वाच्या इतर बातम्या :