Rajesh Kshirsagar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरांच्या गटात सामील झालेले कोल्हापुरातील माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर कोल्हापूरमध्ये परतले आहेत. त्यांनी कोल्हापुरात आल्यानंतर शिंदे गटाबाबत जाण्याची भूमिका स्ष्ट केली. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगली स्तुतीसुमने उधळली. 


राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो, त्यांचा आणि आमचा व्यवसाय नाही, बांधाला बांध नाही, देशातील अनेक राजकीय नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. चंद्रकांत पाटील आमचे नेते आहेत. ते जिल्ह्याचे नेतेच नाहीत, तर राज्याचे नेते असल्याचे क्षीरसागर म्हणाले. बंडखोर शिंदे गटाच्या गळाला लागण्यापूर्वी राजेश क्षीरसागर यांनी अनेकवेळा चंद्रकांत पाटील यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यांना हिमालयात पाठवू, पाठीत खंजीर खूपसला, भाजपच आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असल्याचेही ते म्हणाले होते. 


दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळालेले राजेश क्षीरसागर काल कोल्हापुरात परतले. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. ते बोलताना पुढे म्हणाले की, आम्ही जेव्हा गुवाहाटीला गेलो, तेव्हा प्रथमदर्शनी आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, विश्वासदर्शक ठराव जेव्हा पास झाला तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडून जे काही भाषण झाले त्यानंतर सर्व शिवसैनिकांच्या मनातील गैरसमज दूर झाला आहे. 


मी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन त्यांना पाठिंबा दिला हा कोणताही बंडखोरी नाही. आम्हाला कायद्याने दिलेला हा हक्क आहे. तसेच दर दहा ते पंधरा वर्षांनी शिवसेनेत फूट पडायचा प्रसंग का निर्माण होतो? असा सवाल त्यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला. 55 पैकी 40 आमदार त्यांना सोडून जात आहेत याबाबतचा त्यांनी विचार करावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या