Rajaram Sakhar Karkhana : गेल्या 15 दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरीने तळ गाठलेल्या कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या आज (21 एप्रिल) प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. आज संध्याकाळी 10 वाजता प्रचार थांबणार आहे. त्यामुळे आता पडद्यामागून हालचालींना वेग येणार आहे. दोन्ही गटाकडून केलेल्या आरोपांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कारखान्यासाठी रविवारी 23 एप्रिलला मतदान होणार असून मतमोजणी मंगळवारी 25 एप्रिलला होईल. जिल्ह्यातील साडेसहा तालुक्यातील कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या 112 गावांमध्ये सभा, मेळावा या माध्यमातून प्रचार करण्यात आला. सोशल मीडियाचाही दोन्ही गटाने तितक्याच ताकदीने वापर केला आहे. 


प्रचाराची सांगता कोणाची कशी होणार?


सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून आजच्या सांगता सभेसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. दोन्ही गटाकडून प्रचाराचा शेवट करण्यासाठी होम ग्राऊंडची निवड करण्यात आली आहे. जोरदार शक्तिप्रदर्शनसह विरोधकांची सभा कसबा बावड्यातील मंडईत होणार आहे. दुसरीकडे सत्ताधारी महाडिक गटाची पुलाची शिरोलीत होणार आहे. त्यामुळे शेवटच्या प्रचार सभेत दोन्हीकडून काय आरोप केले जातात? याकडेही आता लक्ष लागले आहे. 


किती जागांसाठी निवडणूक होणार? 


राजाराम साखर कारखान्यासाठी संस्था गटातील एक व उर्वरित गटातील 20 अशा 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. संस्था गटातून सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहेत. संस्था गटातील 129 तर उत्पादक गटातील 13 हजार 409 असे 13 हजार 538 सभासद मतदानासाठी पात्र आहेत.


दोन्ही गटाकडून प्रचाराचे गाठले टोक 


या निवडणुकीसाठी दोन्ही गटाकडून अत्यंत ईर्ष्येने प्रचार झाला. दोन्ही गटातील राजकीय कुस्ती एका कारखान्याच्या निवडणुकीसाठी थेट बिंदू चौकापर्यंत येऊन पोहोचली. दोन्ही गटांकडून आव्हानाची भाषा झाली. एकेरी सुद्धा उल्लेख झाला. त्यामुळे आता मायबाप सभासद काय कौल देतात याचे उत्तर 25 एप्रिलला मिळणार आहे. सत्ताधारी गटाकडून महादेवराव महाडिक यांच्यासह अमल, खासदार धनंजय महाडिक, शौमिका महाडिक यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. आमदार डॉ. विनय कोरे, माजी खासदार निवेदिता माने, आमदार प्रकाश आवाडे गटाने सत्तारूढ आघाडीला पाठिंबा दिला आहे. विरोधी गटाकडून विरोधी गटांकडून आमदार सतेज पाटील, बंधू डॉ. संजय पाटील, आमदार ऋतुराज पाटील मैदानात होते.  


इतर महत्वाच्या बातम्या