Rajarshi Shahu Maharaj : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी सांगता समारंभानिमित्त 6 मे रोजी राजर्षी शाहू समता परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. यंदा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सुरु आहे. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान, 6 मे रोजी याची सांगता केली जाणार आहे. यानिमित्त समता परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.


कोल्हापूर शहरातून भव्य रॅली काढण्याचा निर्णय


6 मे रोजी समता रॅली व समता परिषद घेतली जाणार आहे. शाहू स्मारक भवनमध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे व्याख्यान होणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर शहरातून भव्य रॅली काढण्याचा निर्णय राजर्षी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी संयोजन समितीच्या प्रमुख सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या संदर्भात पुन्हा एकदा मंगळवारी (25 एप्रिल) पुन्हा बैठक घेतली जाणार आहे. प्रलंबित असलेल्या शाहू समाधीस्थळाची कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुढाकार घेण्यासाठी पालकमंत्र्यांना भेट घेतली जाईल.


सर्वच क्षेत्रातील लोकांचा सहभाग असणार


यावेळी बोलताना शेकाप नेते बाबूराव कदम यांनी स्मृती शताब्दीनिमित्त घेतले जाणारे कार्यक्रम सर्वपक्षीय असल्याचे सांगितले. शहरातील सर्वच क्षेत्रातील लोकांचा सहभाग असणार असल्याचे ते म्हणाले. गिरीश फोंडे म्हणाले की, शहरातून चित्र रथ काढून राजर्षींचे विचार सर्वांपर्यंत पोचवले जातील. 6 मे रोजी शहरातून दुपारी चार वाजता रॅली काढली जाईल. शिवाजी चौक, नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळाला रॅली अभिवादन करेल. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थांचाही सहभाग घेतला जाणार आहे. शाहूंच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित पोवाडा शाहीर रंगराव पाटील सादर करतील. सायंकाळी शाहू स्मारक भवन येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे व्याख्यान होईल.


राजर्षी छत्रपती शाहू महाराज माहितीपट महोत्सव


दरम्यान, शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागातर्फे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज माहितीपट महोत्सव 2023’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त शाहू महाराजांच्या योगदानावर माहितीपट निर्मिती स्पर्धा होणार आहे. त्यातील सहभागासाठी नोंदणीसाठी 4 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 11 आणि 12 मे रोजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात हा  कार्यक्रम होणार आहे. स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज, महाविद्यालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र तसेच माहितीपटाची क्लिप journalism@unishivaji.ac.in या मेलआयडीवर 4 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या