Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखान्याच्या 29 अवैध उमेदवारांवरून प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांनी निकाल दिला आहे. अवैध 29 उमेदवारांचे अपील नामंजूर करण्यात आले आहे. या निर्णयाने विरोधी आमदार सतेज पाटील गटाला तगडा झटका बसला आहे. आजच्या (10 एप्रिल) निकालाकडे लक्ष लागले असतानाच  मध्यरात्रीच निकालाच्या प्रती संबंधित उमेदवारांना पोहोचवल्‍या गेल्या आहेत. त्यामुळे या निर्णयाला आता उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार का? याकडे आता लक्ष लागले आहे. 


श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या अवैध उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे दाखल केलेले अपील नामंजूर करण्यात आल्यानंतर आता विरोधी गट कोणती भूमिका घेणार? याचीही उत्सुकता आहे. दुसरीकडे, निवडणूक कार्यक्रम सुरू असल्यामुळे, यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी असणार आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून गुरुवार चिन्हासह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. 


राजाराम कारखाना निवडणूक जाहीर होण्यापासून चर्चेत आहे. जिल्ह्यातील दोन मातब्बर गटांनी कारखान्याच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे दररोज दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांचा फैरी सुरु आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विरोधी गटातील 29 उमेदवार अवैध ठरल्यानंतर या संघर्षाला आणखी धार येणार आहे.


दरम्यान,  सर्वसाधारण गटातील 15, महिला प्रतिनिधी गटातील 2 तर संस्था प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि भटक्या विमुक्त गटातील प्रत्येकी एक अशा 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. संस्था गटाचे 129 तर 13409 अ वर्ग सभासद असे 13538 सभासद मतदानासाठी पात्र आहेत. दुसरीकडे, सभासदांच्या अपात्रतेच्या मुद्यावरून दोन्ही गट आमनेसामने आले होते. त्यामुळे हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला. सर्वोच्च न्यायालयाने सत्ताधारी महाडिक गटाला दिलासा दिला. दरम्यान, निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार, 12 एप्रिल हा अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. मतमोजणी 25 एप्रिलला होणार आहे.


कारखान्याच्या निवडणुकीसाठी कट्टर राजकीय वैर असलेल्या आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) गटामध्ये थेट लढत होत आहे. त्यामुळे सत्तांतर होणार की, महाडिक पुन्हा एकदा सत्ता काबीज करणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.   


राजकीय समीकरणे कशी असणार? 


कारखान्याची लढत थेट पाटील आणि महाडिक गटामध्ये होत असली, तरी करवीर आणि हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक सभासद असल्याने या दोन्ही तालुक्यातील आजी माजी आमदारांची भूमिकाही महत्वाची असणार आहे. कुंभी कारखान्याच्या निवडणुकीत पी. एन. पाटील गटाला धक्का बसल्याने राजाराम कारखान्यात ते महाडिकांसोबत ताकदीनेर राहतील अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे, आमदार विनय कोरेही महाडिकांसोबत राहतील अशी शक्यता आहे. दुसरीकडे प्रकाश आवाडेही त्यांच्यासोबत राहतील असे दिसते.सतेज पाटील यांना गोकुळमध्ये आमदार हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, माजी आमदार डाॅ. सुजित मिणचेकर, कुंभीचे चेअरमन चंद्रदीप नरके यांनी साथ दिली होती. त्यामुळे या ठिकाणी त्याच पद्धतीने साथ मिळणार का? याचीही उत्सुकता आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :