Kolhapur Crime : दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा, त्यानंतर करवीर निवासिनी अंबाबाई रथोत्सव तसेच सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूर पर्यटक आणि भाविकांनी फुलून गेले आहे. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी अक्षरश: उच्छाद केला आहे. जोतिबाच्या यात्रेपासून ते अंबाबाई रथोत्सवात चोरीच्या अनेक घटना घडल्या. चैत्र यात्रेत जोतिबा डोंगरावर लाखोंची मांदियाळी असूनही तब्बल 83 चोरट्यांना पकडण्यात यश आले होते. यानंतर कोल्हापुरात दोन दिवस पार पडलेल्या अंबाबाई रथोत्सवातही तीन महिलांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार घडला. त्यामुळे अनेकांच्या आनंदावर पाणी फेरले आहे. पाकिटमारी, सोनसाखळी, मंगळसूत्रांवर चोरट्यांनी डल्ला मारला. यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा तसेच पर्यटकांचा मुखभंग झाला आहे.     


अंबाबाईच्या रथोत्सवात दोन लाखांचे दागिने लंपास 


चैत्र यात्रेनंतर दुसऱ्याच दिवशी अंबाबाईचा रथोत्सव होत असतो. दोन दिवस झालेल्या रथोत्सवात अलोट गर्दी लोटली होती. याच गर्दीत चोरट्यांनी हात साफ करताना तब्बल 2 लाख 15 हजारांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. तीन महिलांच्या दागिने चोरीला गेल्याची नोंद जुना राजवाडा पोलिसांकडे झाली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु आहे. एका वृद्ध महिलेच्या गळ्यातून दीड तोळ्याची सोनसाखळी लांबवण्यात आली. अन्य एका महिलेची सोन्याची माळ, तसेच तिसऱ्या एका महिलेची सुद्धा सोनसाखळी लंपास करण्यात आली.   


जोतिबा यात्रेत 83 चोरट्यांना पकडले 


दुसरीकडे, चैत्र यात्रा लाखोंची गर्दी होऊनही शांततेत पार पडली. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत अनेक चोरट्यांनी भाविकांचा खिसा रिकामा केला. याच गर्दीतून पोलिसांनी 83 चोरट्यांना ताब्यात घेत अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई करण्यात आली होती. ताब्यात घेण्यात आलेल्या 83 पैकी 47 संशयितांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत व 32 संशयितांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, यात्रेत नेमण्यात आलेल्या मुस्कान व निर्भया पथकाकडून यात्रेत हरवलेल्या 6 अल्पवयीन मुलांचा तत्काळ शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. 


इतर महत्वाच्या बातम्या