Kolhapur News : कर्ज काढून सण साजरे करण्यापेक्षा कुटुंब व समाजाच्या प्रगतीसाठी काम करूया, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. महासंघातर्फ आयोजित कोल्हापुरात (Kolhapur News) मराठा समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महासंघाकडून समाजाला कळकळीचे आवाहन करण्यात आले. 96 कुळीचा बाऊ करू नका, कर्तृत्वाला प्राधान्य द्या, कुंडल्या पेटवून द्या असे आवाहन मुळीक यांनी केले. 


96 कुळीचा बाऊ न करता सर्वांनी मराठा म्हणून एकत्र येऊन लग्न ठरवा


वधू वर मेळाव्यात वधू-वरांची प्रत्यक्ष उपस्थिती वाढवा, लग्नासाठी खोट्या जाहिराती व आर्थिक फसवणुकीपासून सतर्क रहा, अधार्मिक दोन दक्षता पद्धत बंद करा, कुंडली न बघता मुला मुलींच्या कर्तुत्वाला प्राधान्य द्या, 96 कुळीचा बाऊ न करता सर्वांनी मराठा म्हणून एकत्र येऊन लग्न ठरवा. अक्षतांची नासाडी न करता मोजक्याच पाहुण्यांच्या हस्ते अक्षता टाका. लग्नात वारेमाप खर्च करण्यापेक्षा वधू-वराच्या नावे ठेव ठेवा असे आवाहन यावेळी करण्यात आले. 


वसंतराव मुळीक म्हणाले की, समाज अनेक प्रकारच्या अडचणीत आहे. नोकरी जमीन शिक्षण नसल्याचे चित्र समाजात आहे. या स्थितीमध्ये समाजाने कर्ज काढून सण साजरे करू नयेत. त्यापेक्षा प्रगतीकडे लक्ष द्यावे. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ व सारथी संस्थेच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा. लग्न ठरवणे ही तारेवरची कसरत होत आहे. मुलींच्या अपेक्षा वाढल्या असल्याने अनेक एजंट याचा फायदा घेऊन पालकांना फसवत आहेत. 


एका एका गावात 50-60 तरुण रिकामे


वसंतराव मुळीक यांनी आपल्या दौऱ्यातील अनुभव सांगितला. ते म्हणाले की, चैत्र पाडव्याच्या निमित्ताने गावांमध्ये फिरलो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17 लाख मराठा आहे, पण काम नसल्याने एका एका गावात 50-60 तरुण रिकामे बसल्याचे आढळले. या मुलांची लग्न जमत नाहीत ही परिस्थिती गंभीर आहे. मराठ्यांनो जागे व्हा अशी कळकळीची विनंती त्यांनी यावेळी केली. यावेळी झालेल्या वधू वर मेळाव्याला जिल्ह्यातून मराठा समाज बांधव उपस्थित होते. या मेळाव्यात मराठा समाजाच्या अनेक मागण्या व समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. 


इतर महत्वाच्या बातम्या