Pune-Bengaluru National Highway : पुणे-बंगळूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; पुलाच्या पाडकामाला अजून किती दिवस लागणार?
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Bengaluru National Highway) शेंद्रे ते पेठनाका यादरम्यान महामार्गाच्या सहपदरीकरणाच्या कामास वेगाने प्रारंभ करण्यात आला आहे.
Pune-Bengaluru National Highway : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Bengaluru National Highway) शेंद्रे ते पेठनाका यादरम्यान महामार्गाच्या सहपदरीकरणाच्या कामास वेगाने प्रारंभ करण्यात आला आहे. कराडजवळ उड्डाण पूल पाडण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. 28 जानेवारीपासून कामाला प्रारंभ करण्यात आला असला, तरी अजूनही हे काम सुरुच आहे. कामाला प्रारंभ करताना 30 दिवसांमध्ये पाडकाम पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात आलं होत. मात्र, 36 दिवस उलटून गेलं तरी पाडकाम सुरुच आहे. पुलाचे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण ढिगारा हटवून काम पूर्ण करण्यासाठी अजूनही किमान 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील महिन्यापासून शेंद्रे ते पेठ नाका यादरम्यान सातारा ते कागल दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे सहापदरीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे.
रात्रंदिवस पूल पाडण्याचे काम सुरू
कोल्हापूर (Kolhapur News) नाका येथील उड्डाणपूल तसेच मलकापुरातील कृष्णा हॉस्पिटल परिसरातील दोन्ही उड्डाणपूल पाडून एकच सुमारे साडेतीन किलोमीटरचा नवा उड्डाणपूल साकारला जाणार आहे. त्यामुळे कराडजवळील उड्डाणपूल पाडण्यास 25 जानेवारीला पोलिसांकडून परवानगी मिळाल्यानंतर 28 जानेवारीला कामाचा प्रारंभ करण्यात आला. हा उड्डाणपूल पाडण्यासाठी 30 दिवसांचा अवधी लागेल, असे सांगण्यात आले होते. मात्र, रात्रंदिवस पूल पाडण्याचे काम सुरू असूनही अजूनही 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती ठेकेदार कंपनीकडून देण्यात आली आहे.
पाडकामाची स्थिती पाहता या पुलाचे पाडकाम आतातरी पुढील 15 ते 20 दिवसात पूर्ण होणार का? याबाबत साशंकता आहे. शुक्रवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. कोल्हापूर नाक्यावरील पुल पाडकामाच्या आलेल्या अनुभवावरून दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु असल्याने मलकापुरातील पुल पाडकामाला सुरुवात करू नये, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे.
पुल पाडकामामुळे वाहतुकीत बदल
दरम्यान, बदल करण्यात आलेल्या नव्या नियोजनानुसार कराडहून साताऱ्याकडे जाणारी अवजड वाहतूक भाडी हार्डवेअरसमोरून न जाता कोल्हापूर नाकामार्गे ढेबेवाडी फाट्यावर यू-टर्न घेईल. त्यानंतर ते कोल्हापूर नाकामार्गे वारुंजी फाट्यावरील ओव्हरब्रिजचा वापर करून साताऱ्याकडे जातील. महामार्गावरून कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहने अक्षता मंगल कार्यालयातून सर्व्हिस रोडवर येऊन महामार्गावर गंधर्व हॉटेल येथून प्रवेश करतील.
कोल्हापूरहून साताऱ्याकडे जाणारी वाहने कोयना औद्योगिक वसाहत, मलकापूर येथील सर्व्हिस रोडने प्रवेश करतील आणि पंकज हॉटेलच्या पश्चिमेकडील महामार्गाकडे जाण्यासाठी सरळ पुढे जातील आणि तेथून कोयना नदीच्या पुलावरून साताऱ्याकडे जातील. ढेबेवाडी फाटा आणि मलकापूर फाट्याच्या उत्तरेकडून जाणारा बोगदा बंद करण्यात येणार आहे. पूर्वीच्या अधिसूचनेनुसार वारुंजी फाटा ते गंधर्व हॉटेल आणि कोयना इंडस्ट्रियल इस्टेट ते वारुंजी फाटा हा रस्ता एकेरी राहील. या रस्त्यावर वाहने पार्क करण्यास सक्त मनाई असेल. दरम्यान, ढेबेवाडी फाटा आणि कृष्णा हॉस्पिटलसमोरील उड्डाणपूल खुला राहणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :