Prakash Abitkar : आरोग्य सेवेत 'ए आय' तंत्रज्ञानाचा वापर करणार : प्रकाश आबिटकर
Prakash Abitkar News : सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक गतीशील करण्यासाठी कर्मचाऱ्यांची भरती आणि नवीन पदांच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे. तशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य सेवेत 'एआय' (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 'वर्षा' निवासस्थानी पार पडलेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच या बैठकीत 'समग्र' संस्थेच्या वतीने आरोग्य सेवा बळकटीकरण अंतर्गत आरोग्य संस्थांचे स्टार रेटिंग, आरोग्य समीक्षा, आरोग्य हेल्पलाइन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच रिव्ह्यू इत्यादी बाबींचे सादरीकरणही करण्यात आले.
आरोग्यमंत्र्यांच्या मागणीवर मुख्यमंत्री सकारात्मक
'आपले गाव, आरोग्य संपन्न गाव' योजना, पॉलिएटिव्ह केअर, सिकलसेल, वैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रिया सुलभ करणे, वैद्यकीय अधिकारी मानधन वाढ, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समावेशन जलद होणे, आयुष संचालक, प्रशिक्षण संचालक, नर्सिंग ही पदे निर्माण करण्याबाबत मागणी करण्यात आली. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी सकारात्मक प्रतिसाद देत आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या बैठकीस मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, समग्र संस्थेचे प्रतिनिधी गौरव गोयल, तसेच सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
ही बातमी वाचा:























