Ambabai Mandir : नवरात्रौत्सव काळात अंबाबाई मंदिरात पेड ई पास सुविधा दिली जाणार आहे. या उपक्रमाला काही संघटनांनी विरोध केला आहे. मात्र, हा विरोध होत असला, तरी जिल्हाधिकारी राहुल रेखावार पेड ई पास उपक्रमावर ठाम आहेत. उत्सव काळामध्ये ऑफलाईन पद्धतीने हे ई पास दिले जाणार आहेत. दिवसाला फक्त 1 हजार भाविकांना या पेड ई पासद्वारे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे इतर भाविकांची कोणतीही गैरसोय नसल्याचा दावा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केला.
भाविकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला असून या पेड पासमुळे मंदिराचं बाजारीकरण होणार असल्याचा दावा देखील त्यांनी खोडून काढला. उत्सव काळात महाद्वार रोड खुला ठेवण्यावर देखील त्यांनी जिल्हा प्रशासनाची भूमिका यावेळी स्पष्ट केली.
भाविकांना सुविधा देण्यावर भर
दरम्यान, कोरोनामुळे गेल्यावर्षी दर्शनासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला होता. मात्र, यंदा गाभार्यामध्ये दर्शनाला जाणार्या भाविकांना दर्शन रांगेतून जावे लागणार आहे. शिवाजी चौकापासून दर्शन रांगेसाठी मंडप उभारला जाणार आहे. मुखदर्शनासाठी भाविकांना महाद्वारसह सर्व दरवाजांतून प्रवेश दिला जाईल. त्यासाठी गरुड मंडपाशेजारी रांग लावण्यात येणार आहे. दर्शनानंतर सर्व दरवाजांतून बाहेर पडता येईल.
तसेच भाविकांसाठी दर्शन रांगेसह ठिकठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच देवस्थानचे कर्मचारी दर्शन रांगेत पिण्याचे पाणी देणार आहेत. शिवाजी चौक, जुना राजवाडा, बिनखांबी गणेश मंदिर, जोतिबा रोड, ताराबाई रोड, महाद्वार रोड या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या