Lumpy Skin Disease : कोल्हापूर जिल्ह्यातही लम्पी चर्मरोगाचा प्रकोप सुरुच असून आतापर्यंत 108 जनावरे बाधित  झाली आहेत. आजपर्यंत मृत झालेल्या 9 पशुधनाचा मृत्यू झाला असून त्यापैकी 6 गायी व 3 बैल आहेत. दरम्यान, बाधित जनावरांची संख्या वाढतच चालल्याने पशुधन मालकांनी आपल्या निरोगी जनावरांचे लसीकरण व आजारी जनावरांवर उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन राहुल रेखावार यांनी केलं आहे. 


राहुल रेखावार म्हणाले की, पशुधनामध्ये होणाऱ्या लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पशुधन मालकांनी आपल्या निरोगी जनावरांचे तात्काळ लसीकरण करुन घ्यावे. आजारी जनावरांवर उपचार करुन घ्यावेत. तसेच मृत पशुधनाविषयी तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये माहिती द्यावी. 


कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण गाय वर्ग पशुधन 2 लाख 83 हजार 637 एवढे आहे. आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात तयार झालेल्या पाच एपिक सेंटरमध्ये एकूण बाधित गाय वर्ग पशुधनाची संख्या 108 झाली आहे. त्यापैकी 88 गायी व 20 बैल आहेत. जिल्ह्यात ऍक्टिव्ह आजारी पशुधनाची संख्या 76 आहे. आजपर्यंत मृत झालेले पशुधन 9 असून त्यापैकी 6 गायी व 3 बैल आहेत. 


आजअखेर लम्पी रोगावरील लसीकरण 1 लाख 47 हजार 390 पूर्ण झाले आहे. त्यापैकी शासकीय संस्थांनी केलेले लसीकरण 75 हजार 340 एवढे आहे. विविध संघामार्फत जसे गोकुळ, वारणा व स्वाभिमानी यांच्यामार्फत 72 हजार 50 एवढे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण उपलब्ध असलेला  लसींचा साठा 2 लाख 85 हजार 400 एवढा आहे.


दुसरीकडे जिल्ह्यामध्ये हातकणंगले तसेच पन्हाळा तालुक्याही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. लम्पी आजाराबाबत पशुपालकांनी घाबरुन न जाता नियमांचे पालन करावे, असे आवाहन पुण्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र सिंह यांनी केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या