Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे यासाठी गेली ३८ वर्षे लढा सुरू आहे. इतका प्रदीर्घ काळ लढा देऊनही निर्णय झालेला नाही. त्यामुळे या लढ्याला व्यापक स्वरुप तसेच पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या (ता.21) खंडपीठ कृती समितीची बैठक न्याय संकुलातील कक्ष क्रमांक एकमध्ये सायंकाळी पाच वाजता घेण्यात येणार आहे. या बैठकीला सहा जिल्ह्यांतील असोसिएशनचे पदाधिकारी तसेच वकील बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत लढ्याचे पुढील धोरण ठरविले जाणार असल्याची माहिती सचिव ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी करत निवेदने सादर केली आहेत. हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्री यांची भेट आवश्यक आहे. त्यामुळे पुढील लढ्याचे धोरण ठरविण्यासाठी खंडपीठ कृती समितीने सहा जिल्ह्याची बुधवारी बैठक आयोजित केली आहे.
कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. खंडपीठ कृती समितीच्या वतीने विविध स्तरांवर आंदोलनेही झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीसह विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना साकडे घालण्यात आले. मात्र, आजअखेर ठोस निर्णय घेण्यात आला नाही. हा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला आहे, अशी खंत अॅड. गिरीश खडके यांनी व्यक्त केली आहे.
तातडीने सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लावणार
दरम्यान, कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच स्थापन (Kolhapur Circuit Bench) करण्यासाठी सहा जिल्ह्यांतील लोकांचा गेली 35 वर्षे लढा सुरू आहे. कोल्हापूर येथे सर्किट बेंच सर्वसामान्य जनता, पक्षकारसाठी स्थापन होणे आवश्यक आहे. यासाठी लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन तातडीने सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लावणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
मंत्री देसाई पुढे म्हणाले की, सहा जिल्ह्यांचा सर्किट बेंच प्रश्न जिव्हाळ्याचा आहे, तरी कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन होईपर्यंत मी स्वतः लक्ष देऊन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. याकरिता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन तातडीने सर्किट बेंच हा प्रश्न मार्गीलावणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या