Raju Shetti : मणिपूरमधील महिलांवरील रानटी अत्याचाराचे देशाची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. मानवी क्रौयाची परिसीमा मणिपूर (Manipur) हिंसाचारात गाठली गेली असून यामध्ये देशासाठी जीवाची पर्वा न करता लढलेल्या जवानाच्या पत्नीवरही अत्याचार झाला आहे. मे महिन्यातील अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल जुलै महिन्यात झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. देशभरात महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीन दिवस अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. 






राजू शेट्टी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मणिपूरसहित देशातील इतर ठिकाणी महिलांवर अत्याचार करणारे मोकाट सुटलेले असताना एक जबाबदार नागरिक या नात्याने प्रायश्चित म्हणून सोमवार दिनांक 24 जुलै सकाळी 10 वाजल्यापासून पुढील 72 तास अन्नत्याग करत आहे.


राजू शेट्टी काय म्हणाले?


राजू शेट्टी पुढे म्हणाले की, मणिपूरमध्ये नराधमांनी महिलांची नग्न धिंड काढून नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. या घटनेला जवळपास अडीच महिने झाले आहेत तरी केंद्र आणि राज्य सरकारला जाग आलेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री अशा प्रकारच्या शेकडो घटना झाल्याचे सांगत आहेत. यावरून बेफिकीर आणि बेजबाबदारपणा त्यांच्या वक्तव्यातून दिसून येतो. या नराधमांवर कोणतीच कारवाई झाली नसल्याने अन्य राज्यातही अशा घटना घडत आहेत. त्यामुळे काहीच कारवाई होत नाही, असे या समाजकंटकांना वाटत आहे. मात्र, या घटनेमुळे सारा देश शरमिंदा झाला आहे. केंद्र आणि राज्याची जबाबदारी आहे त्या पद्धतीने नागरिकांची सुद्धा आया बहिणींना संरक्षण देण्याची जबाबदारी आहे. ज्या घटना घडल्या आहेत त्याची नैतिक जबाबदारी घ्यावी लागेल. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून मी आणि आमच्या सहकाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 


दरम्यान, मणिपूरमध्ये दोन महिलांची धिंड काढल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. शुक्रवारपर्यंत (21 जुलै) 4 आरोपींना अटक करण्यात आली होती. 19 जुलै रोजी समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये दोन महिलांची एका समुदायाकडून विवस्त्र अवस्थेत धिंड काढण्यात आली होती. त्यानंतर महिलांवर सामूहिक अत्याचार झाल्याचाही आरोप होता. 


इतर महत्वाच्या बातम्या