Manipur Violence: मागील काही महिन्यांपासून हिंसाचारात होरपळत असलेल्या मणिपूरमधील (Manipur) आणखी एका घटनेने देशात खळबळ उडाली आहे. दोन महिलांची भररस्त्यात विवस्त्र धिंड काढण्यात आली. त्यानंतर या महिलांवर सामूहिक अत्याचार करण्यात आले असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. 


मणिपूरची राजधानी इंफाळपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कंगपोकपी जिल्ह्यात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना 4 मे रोजीची असल्याची माहिती आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. 


ITLF ने काय म्हटले?


पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिजिनियस ट्रायबल लीडर फोरमने (ITLF) म्हटले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एका समुदायाच्या जमावाने दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली असून शेतात त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला आहे. ITLF ने राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित आदिवासी आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे. 


कुकी आदिवासींच्या संघटनेकडून गुरुवारी चुरचांदपूर येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चातही या अत्याचाराचा मुद्दा उचलण्यात येण्याची शक्यता आहे. 


काँग्रेसचा सरकारला सवाल 


दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.  मणिपूरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौन अराजकता निर्माण करत आहे. आयडिया ऑफ इंडियावर जोपर्यंत सातत्याने हल्ला सुरू आहे, तोपर्यंत भारत गप्प बसणार नाही. आम्ही मणिपूरच्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत. शांतता हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. 







काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. “मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराची चित्रे हृदय पिळवटून टाकणारी आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या या भीषण घटनेचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. समाजातील हिंसाचाराचा सर्वाधिक फटका महिला आणि मुलांना सहन करावा लागतो. मणिपूरमधील शांततेसाठी प्रयत्नांना पुढे नेत असताना आपण सर्वांनी एका आवाजात हिंसाचाराचा निषेध केला पाहिजे. मणिपूरमधील हिंसक घटनांकडे केंद्र सरकार, पंतप्रधान डोळे झाकून का बसले आहेत? अशी चित्रे आणि हिंसक घटना त्यांना अस्वस्थ करत नाहीत का? असा सवाल त्यांनी केला. 


गुरुवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरमधील हिंसाचारावर चर्चा होणार आहे. केंद्र सरकारने बुधवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित केला. यावर आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत, असे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले.