Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यासह (Kolhapur News) सातारा जिल्ह्याच्या (Satara) पश्चिमेला गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पावसाने महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या सातारमधील कोयना धऱणातही वेगाने पाणीसाठा होत आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने गेल्या चार दिवसांपासून गती घेतल्याने 15 प्रमुख धरणांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. राधानगरी धरणात 77 टक्के पाणीसाठा स्वयंचलित दरवाज्यांपर्यंत पाणी  येऊन ठेपले आहे. सध्या धरणातून 1400 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. 


कोल्हापूर आणि सातारसाठी 26 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट 


दरम्यान, हवामान विभागाकडून आजपासून पुढील पाच दिवस कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून आजपासून 26 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे, सांगली जिल्ह्यासाठी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. तब्बल दीड महिन्यांनी वरुणराजाने सांगलीत दर्शन दिल्यानंतर चांगला जोर धरला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात सर्वदूर सुखाच्या सरी कोसळल्या. 






सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला दमदार पाऊस 


जिल्ह्यात पाटण, कऱ्हाड, महाबळेश्वर, वाई तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जनजीवन विस्कळीत होऊन नद्यांना पूर आले आहेत. दरडी कोसळण्याचेही प्रमाण वाढले आहे. आज महाबळेश्वर तालुक्यातील घावरी - एरणे रस्त्यावर दरड कोसळली. मात्र, जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. फलटण तालुक्यात ओढे, नाले, तलाव अजूनही कोरडे आहेत. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आहे. दुसरीकडे, कोयना धरणात सध्या 43.14  टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 


कोल्हापुरात पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल


कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसाने विविध नद्यांवरील 75 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. बंधारे पाण्यात गेल्याने अन्य पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा  वेगाने होत आहे. त्यामुळे नदीने इशारा पातळीकडे वाटचाल सुरु केली आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी आज (22 जुलै) रात्री नऊ वाजेपर्यंत 36 फुट 7 इंचावर पोहोचली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुट असून धोका पातळी 43 फूट आहे. एकूण 75 बंधारे पाण्याखाली आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या