Ajit Pawar on Kolhapur NCP: ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्थापना करताना कोल्हापूर जिल्ह्याने शंभर हत्तींचे बळ दिले त्याच कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची दयनीय अवस्था पाहून अजित पवार चांगलेच संतप्त झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अजित पवारांनी पक्षाची झाडाझडती घेत पक्ष वाढवण्याचा सल्ला दिला. कधीकाळी कोल्हापूर जिल्ह्यात पाच आमदार आणि दोन खासदार अशी ताकद असणाऱ्या राष्ट्रवादीचे आज केवळ दोनच आमदार आहेत. ते सुद्धा स्थानिक राजकारणात एकमेकांच्या विरोधात संधी मिळेल तेव्हा उभे असतात. दुसरीकडे, ज्यांच्याकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद आहे ते ए. वाय. पाटील आणि माजी आमदार के. पी. पाटील यांच्यातील राजकीय शीतयुद्धाने राष्ट्रवादी पक्षच रसातळाला गेल्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीत 1999 मध्ये कोल्हापुरात पन्हाळ्यातून विनय कोरे, करवीरमधून दिग्विजय खानविलकर, कागलमधून हसन मुश्रीफ, गडहिंग्लजमधून बाबासाहेब कुपेकर आणि चंदगडमधून नरसिंग पाटील यांनी विजय मिळवला होता. लोकसभेला कोल्हापुरातून सदाशिवराव मंडलिक आणि इचलकरंजीमधून निवेदिता माने यांनी विजय मिळवला होता. यानंतर या निकालाची पुनरावृत्ती राष्ट्रवादीला आजवर करता आलेली नाही.
त्यामुळे एका बाजूने सतेज पाटील यांनी पदरचा खर्च करून काँग्रेसला कोल्हापुरात उर्जितावस्था दिली असताना राष्ट्रवादीची इतकी दयनीय अवस्था का झाली? याचा विचार कधीच स्थानिक नेतृत्वाने केलेला नाही. त्यामुळेच की काय अजितदादांना कागलच्या पुढे राष्ट्रवादी नेण्याचा प्रयत्न करा, असे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आपल्याच नेत्यांची झाडाझडती घेताना सांगण्याची वेळ आली. अजितदादांनी 10 पैकी 6 आमदार कोल्हापुरात राष्ट्रवादीचे निवडून आणा म्हणून सांगितले असले, तरी हा वाद कसा सोडवणार? हाच प्रश्न अनुत्तरित आहे. यापूर्वीही झालेल्या कोल्हापूर दौऱ्यात अजितदादांच्या उपस्थितीत बाबासाहेब पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याला जिल्हा बँकेतील राजकारणाची किनार होती.
हसन मुश्रीफ जिल्ह्यातील एकमेव ताकदवर नेते
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवारांचे निष्ठावंतापैकी एक असलेल्या माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ हेच कोल्हापुरात राष्ट्रवादीचा चेहरा आहेत. जिल्ह्यात आजघडीला राष्ट्रवादीचे केवळ दोनच आमदार आहेत. यामध्ये स्वत: मुश्रीफ आणि राजेश पाटील यांचा समावेश आहे. मात्र, या दोन्ही आमदारांची स्थानिक पातळीवर विरुद्ध दिशेला तोंडे आहेत. याचा फटका पक्षाला बसला आहे. गोकुळ आणि अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना निवडणुकीत आमदार राजेश पाटील हसन मुश्रीफ यांच्या विरोधात होते. दोन्ही ठिकाणी राजेश पाटील यांना आपल्याच पक्षाच्या आमदाराकडून पराभव स्वीकारावा लागला. ही स्थिती असतानाच मुश्रीफ गेल्या पाच महिन्यांपासून ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बँकेवरही ईडीकडून तीनवेळा छापेमारी झाली आहे. मुश्रीफांविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाचा चेहराच अडचणीत असल्याचे चित्र आहे.
मेव्हण्या पावण्यांच्या वादाने पक्ष जर्जर
दोन विद्यमान आमदारांची नुरा कुस्ती सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आणि त्यांचे नात्याने मेहुणे असलेले माजी आमदार के. पी. पाटील यांच्यातील वादही सर्वश्रुत आहे. या वादाचा उल्लेख अजितदादांना करावा लागला यावरून दोघांमधील किती टोकाला गेला आहे हे दिसून येते. मेव्हण्या पावण्यांच्या राजकीय वादा भुदरगड राधानगरी मतदारसंघातून आमदार प्रकाश आबिटकरांनी दोनवेळा बाजी मारली हे सांगण्यासाठी राजकीय विश्लेषकांची गरज नाही. ए. वाय. पाटील शिंदे गटाच्या व्यासपीठावरही दिसून आले होते. आता बिद्रीमध्ये ए. वाय. पाटील काय करतात? याकडेही लक्ष असेल यात शंका नाही. आमदार होणारच असा चंगच त्यांनी बांधला आहे. त्यामुळे हा कसा सोडवणार? हे सुद्धा औत्सुक्याचे असेल.
कोल्हापूर शहरामध्येही तीच स्थिती
हा वाद सुरु असतानाच कोल्हापुरातही पदाधिकाऱ्यांचा वाद उफाळून आला होता. डिसेंबर महिन्यात सीमाभागातील कर्नाटक सरकारच्या दंडेलशाहीच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार आणि जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांच्यात वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीनंतर एकेरी उल्लेख करण्यापर्यंत हा वाद वाढत गेला. सर्किट हाऊस परिसरात हा वाद झाला होता. शेवटी आदिल फरास यांनी मध्यस्थी करून दोन्ही नेत्यांना बाजूला करून वादावर पडदा टाकला होता.
लोकसभेला काय चित्र असेल?
आगामी लोकसभा कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडी म्हणून लढल्यास उमेदवार कोण असणार? याकडेही लक्ष आहे. अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात लोकसभेसाठी इच्छूक असलेल्या चेतन नरके यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांनी भाकरी फिरवण्याचे संकेत दिले. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे सुतोवाच त्यांनी केले. 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून लढलेल्या धनंजय महाडिक यांनी भाजपत प्रवेश केला आहे. शिवसेना भाजप युतीत कोल्हापूरच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे आहेत, तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून लढल्यास दोन्ही पक्ष मेरिटचा उमेदवार म्हणून कोणाच्या पारड्यात मत टाकतात हे सुद्धा औत्सुक्याचे असेल.
इतर महत्वाच्या बातम्या